बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद हे आज (मंगळवार) राष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कोविंद भारताच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी स्थानापन्न होणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती केहर हे कोविंद यांना शपथ देतील. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती आपल्या आसनांची अदलाबदल करतील.

नियमाप्रमाणे आसन बदल होताना काही मिनिटांसाठी न्या. केहर राष्ट्रपती समजले जातील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोविंद हे प्रणव मुखर्जींबरोबर राष्ट्रपती भवनपासून संसदेपर्यंत बग्गीत जातील. यादरम्यान मुखर्जी हे डावीकडे तर कोविंद हे उजव्या बाजूला बसतील. सरन्यायाधीश केहर, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि उपराष्ट्रपती हामिद अन्सारीही सेंट्रल हॉलला जाताना त्यांच्याबरोबर असतील.

शपथ ग्रहण केल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये नूतन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण होईल. त्यानंतर मुखर्जी कोविंद यांच्याबरोबर आपल्या नव्या निवासस्थानी म्हणजे १०, राजाजी मार्ग येथे पोहोचतील. तिथे अर्थमंत्री अरूण जेटली त्यांचे स्वागत करतील.

त्यानंतर सैन्य दलाचे तिन्ही दल कोविंद यांना त्यांच्या जुन्या घरी नेतील. त्यांना बग्गीत बसवून राष्ट्रपती भवनापर्यंत नेले जाईल. तेथील प्रांगणात लष्कराच्या तिन्ही दलांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिले जाईल.

माजी राष्ट्रपतींना एक वाहन, चालक आणि इंधन सरकारकडून दिले जाते. मुखर्जींच्या निकटवर्तीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या कार्यालयाकडून टोयोटा कॅमरी कारची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रपतिपदी असताना मुखर्जी हे मर्सिडीजचा वापर करत असत.