राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची कारकीर्द सुवर्णाक्षरात लिहीली जाईल याची खात्री आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. आजच राष्ट्रपतीपदासाठीची मतमोजणी पूर्ण झाली आणि त्यात रामनाथ कोविंद यांचा विजय झाला. या विजयानंतर रामनाथ कोविंद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

समाजातल्या मागास घटकातून आलेला माणूस आज देशाच्या सर्वोच्चपदी बसतो आहे ही बाब निश्चितच आपल्या देशाच्या परंपरेला साजेशी आहे. रामनाथ कोविंद हे आपल्या देशाला वेगळी उंची गाठून देतील त्यांची कारकीर्द सोन्याच्या अक्षरांनी लिहीली जाईल असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला आहे. रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आहे, असंही प्रधान यांनी म्हटलं आहे.

१० लाख ६९ हजार ३५८ मतांपैकी मीरा कुमार यांना ३ लाख ६७ हजार मतं मिळाली आहेत. तर रामनाथ कोविंद यांना ७ लाख २ हजार ४४ मतं मिळाली आहेत. आता देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर रामनाथ कोविंद शपथ घेतील आणि देशाचे राष्ट्रपती होतील.

रामनाथ कोविंद हे विजयी झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर कोविंद यांची कारकीर्द सुवर्णाक्षरात लिहीली जाईल असं म्हटलं आहे.