गुरुमीत बाबा राम रहिमच्या गुहेत ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो प्रमाणेच एक खेळ खेळला जात असे असा धक्कादायक खुलासा हनीप्रीतचा पूर्वाश्रमीचा नवरा विश्वास गुप्ता याने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. ‘एएनआय’ या वृत्त वाहिनीने या संदर्भातले ट्विट केले आहेत. नवरा आणि बायकोच्या सहा जोड्या बाबा राम रहिमच्या गुहेत २८ दिवस राहिल्या होत्या असेही विश्वास गुप्ताने म्हटले आहे.

एवढेच नाही तर हनीप्रीत ही मुलगी असल्याचा दावा बाबा राम रहिम कायम करत आला आहे. मात्र हनीप्रीतला दत्तक घेण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जगाला दाखवण्यासाठी बाबा राम रहिमने हनीप्रीत ही मुलगी असल्याचे भासवले. प्रत्यक्षात या दोघांमध्ये अनेकदा शरीरसंबंधही प्रस्थापित झाले आहेत. या दोघांमध्ये असलेले नाते वडिल आणि मुलीचे नाही. वडिल मुलीच्या नात्याला कलंक लावणारे आहे, असा आरोपही विश्वासने केला.

बाबा राम रहिम म्हणजे समाजातील वजनदार व्यक्ती आहे, त्याला तुरुंगवास झाला असला तरीही तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो असा आरोपही विश्वासने केला. गुरुमीत बाबा राम रहिमसोबत कारचा ताफा असे. एवढेच नाही तर त्याच्या कारमध्ये एक बॉक्स असे ज्यामध्ये हत्यारे असत. त्याचे सुरक्षा रक्षक त्याला हवी असलेली कार त्याच्यासाठी हजर करत, अशी माहितीदेखील विश्वासने दिली.

मी तुमच्या समोर आत्ता पत्रकार परिषद करतो आहे. मात्र पुढच्या वेळी मी तुमच्यासमोर येईन की नाही मला ठाऊक नाही. कदाचित मला ठारही केले जाऊ शकते असा धक्कादायक आरोप विश्वास गुप्ताने केला. मला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवण्यात आले. राम रहिमच्या गुंडांनी टॉर्चर केले. मला ठार करण्यासाठी सुपारी देण्यात आली.
दोन साध्वींच्या बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात बाबा राम रहिमला २० वर्षांची शिक्षा झाली. सध्या तो रोहतकच्या सुनेरिया तुरुंगात शिक्षा भोगतो आहे.

२५ ऑगस्ट २०१७ ला त्याला दोषी ठरवण्यात आले त्यानंतर तीन दिवसांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबा राम रहिमला २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत फरार आहे तिचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर विश्वास गुप्ताने केलेल्या आरोपांमुळे बाबा राम रहिमच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.