जम्मू-काश्मीरमध्ये पंचायतीने दिलेल्या वादग्रस्त आदेशानंतर बलात्कार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. फझल हुसेन (२५) असे या तरूणाचे नाव असून तो राजौरी जिल्ह्यात राहत होता. काही दिवसांपूर्वी एका मुलीने फझलने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर स्थानिक पंचायतीने शिक्षा म्हणून फझलला संबंधित मुलीचे मूत्रप्राशन करण्याचा आदेश दिला. त्यामुळे तणावाखाली आलेल्या फझलने रविवारी येथील समसार तलावात उडी मारून आत्महत्या केली.

फझल हुसेन हा पदवधीर असून त्यांचे लग्न झाले होते. त्याच्यावर एका मुलीने बलात्कार केल्याचा ठपका ठेवला होता. त्यावेळी स्थानिक पंचायतीमधील मुफ्तींनी शिक्षा म्हणून फझलने मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी किंवा संबंधित मुलीचे मूत्रप्राशन करावे, यापैकी एका पर्यायाची निवड करण्यास सांगितले होते. त्यामुळे फझलने दबावाखाली येऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता स्थानिक अधिकारी मोहम्मद जहांगीर यांनी व्यक्त केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. समसार तलावाच्या काठावर सापडलेल्या मोहम्मदच्या चपलांवरून मोहम्मदची ओळख पटवण्यात आली. या प्रकरणात अजून कोणालाही अटक झालेली नाही.

दरम्यान, फझल हुसेन याने आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करून ठेवला आहे. आपली बाजू सर्वांना कळावी, यासाठी फझलने आत्महत्येपूर्वी मोबाईल आपल्या एका नातेवाईकाकडे देऊन ठेवला होता. यामधील व्हिडिओत फझलने मुफ्तींवर आरोप केले आहेत. आपल्या घराच्या चार भिंतींच्या आत लोकांनी न्यायालय थाटले आहे. याच ठिकाणी हे लोक खऱ्या खोट्याचा फैसला करतात आणि न्याय देतात, अशी खंत फझलने व्हिडिओत व्यक्त केली आहे. केवळ एका मोबाईल संभाषणावरून आपल्याला आरोपी ठरवण्यात आले. मला धमकावून हे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. लियाकत आणि जब्बार या दोघांनी हे प्रकरण पंचायतीमध्ये नेण्यापूर्वी आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही केल्याचे फझलने व्हिडिओत म्हटले आहे.