दिल्लीत १६ डिसेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक जण निव्वळ अल्पवयीन असल्यामुळे त्याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. मात्र केवळ अल्पवयीन असल्यामुळे त्याने केलेल्या गुन्ह्य़ाची तीव्रता कमी होत नाही असे सांगत, ‘त्या’ पीडित मुलीच्या भावाने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पीडित तरुणीच्या भावाने सांगितले की, सदर मुलगा अवघ्या चार महिन्यांनी १८ वर्षांचा होणार होता. त्यामुळे, चांगले-वाईटाचे भान त्याला नव्हते असे म्हणता येणार नाही. दिल्ली पोलिसांनी योग्य त्या बाबींची पूर्तता करावी आणि नाव वगळण्यात आलेल्या त्या मुलाचाही आरोपपत्रात समावेश होईल हे पाहावे, अशी विनंती त्याने पोलिसांना केली.