विज्ञानाला नवीन असलेली फुलपाखराची एक नवीन प्रजाती अरूणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्य़ात सापडली आहे.
बँडेड टिट (हायपोसिना नारडा) असे या फुलपाखराचे नामकरण करण्यात आले असल्याचे मुख्य वनसंवर्धक डॉ. योगेश यांनी सांगितले.
या फुलपाखराच्या शोधामुळे अरूणाचलची जैवविविधता सिद्ध झाली आहे, असे सांगून ते म्हणाले की, चांगलांगच्या कमी उंचीवरील जंगलात हे फुलपाखरू सापडते, त्याचे जीवनचक्रही आश्चर्यचकित करणारे आहे. प्रौढ फुलपाखरे दरवर्षी मार्च महिन्यात दोन आठवडे दिसतात व नंतर वर्षांचा बराच काळ निष्क्रिय अवस्थेत राहतात. ही फुलपाखरे पक्ष्यांच्या विष्ठेवर
जगतात व जंगलातील थंड पाण्याच्या प्रवाहाजवळ वास्तव्यास असतात.
या फुलपाखराचे वर्णन करून नामकरण करण्यात आले असले तरी त्याचे जीवशास्त्र नेमके उलगडलेले नाही. या फुलपाखराच्या अळ्या वनस्पतीवर असतात, पण त्यांना नेमका कसा अधिवास लागतो हे समजलेले नाही. बँडेड टीट या फुलपाखराचे वर्णन बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेसमधील संशोधक डॉ.कृष्णमेघ कुंटे यांनी एका शोध निबंधात केले आहे. यापूर्वी चमकदार डोळ्यांच्या ‘अरगस’ या फुलपाखराच्या प्रजातीचा शोध अरूणाचलात काही वर्षांपूर्वी लागला होता, त्याचे शास्त्रीय नाव कॅरेलेबिया डिबानजेनसिस आहे. बँडेड टीट या फुलपाखराच्या शोधामुळे अरूणाचलात आणखी वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलपाखरांचा शोध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फुलपाखरांच्या अनेक प्रजाती तेथे असून त्या अजून आपल्याला माहिती नाहीत. दूरस्थ पर्वत व जंगलांत, तसेच सर्व ईशान्य भारतात फुलपाखरांच्या नवीन प्रजाती सापडू शकतात असे योगेश यांनी म्हटले आहे.