जुलै २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा काश्मिरी कमांडर बुरहान वानीसहित काही दहशतवाद्यांच्या खात्मा करणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना सेना पदकाने गौरवण्यात आले आहे. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले मेजर संदीपकुमार, कॅप्टन माणिक शर्मा आणि नायक अरविंदसिंह चौहान यांना हे पदक देण्यात आले आहे. ८ जुलै रोजी झालेल्या या ऑपरेशनमध्ये गुप्तचर सूत्रांकडून मेजर संदीपकुमार यांना बमदुरा गावात सरताज अजीज व इतर दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. अनंतनागपासून १८ किमी. दूर असलेल्या या गावाला घेरण्यात आले होते. मेजर संदीपकुमार, कॅप्टन माणिक शर्मा आणि नायक अरविंदसिंह चौहान यांना या दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते त्या घरावर हल्ला करण्यासाठी अनेक तास वाट पाहावी लागली. या कारवाईविरोधात मोठ्याप्रमाणात लोक एकत्र येऊन लष्कराच्या तुकडीवर दगडफेक करत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. असॉल्ट टीमचे नेतृत्व करत असलेल्या कॅप्टन शर्मा आणि त्यांच्या टीमने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामस्थांनी तुफान दगडफेक केल्याने त्यांना परतावे लागले होते.

संध्याकाळ होत होती. लोकांकडून आमच्यावर तुफान दगडफेक करण्यात येत होती. त्यामुळे आम्ही प्रत्येक क्षण मोजत घराला घेरण्याची योजना बनवत होतो. मेजर कुमार आणि त्यांच्या टीमने घरात घुसण्याचा आणखी एक प्रयत्न करून पाहिला पण दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. अजीजने पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु त्याला घटनास्थळीच यमसदनास धाडले. वेळ निघून चालली होती आणि आत आणखी दोन दहशतवादी होते. जसजसा विरोध वाढू लागला. तेव्हा मेजर कुमार यांनी एका स्थानिक इमामला पाठवून ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्नक केला. अंधार पडण्यास सुरूवात झाली होती. पण ग्रामस्थांचा राग काही कमी होत नव्हता, असे या ऑपरेशनच्या वेळी या तुकडीबरोबर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मेजर आणि त्यांच्या जवानांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही दहशतवाद्यांनी पळून जाण्यासाठी गोळीबार सुरू केला. दहशतवादी परवेज अहमद लष्करीला हा एका व्यक्तीला वाचवण्यासाठी गोळीबार करताना दिसला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात लष्करी ठार झाला. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांनाही मारण्यात आले. नंतर समजले की शेवटचा दहशतवादी हा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी होता. काश्मीर खोऱ्यात तो पोस्टर बॉय म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्यावर १० लाख रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक महिने हिंसाचार उसळला होता.