भारताचे अग्रगण्य उद्योगपती रतन टाटा यांना येथील विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ बिझनेस’ ही मानद पदवी बहाल केली. टाटा यांची दूरदृष्टी, समाजाबद्दल असलेली उत्तरदायित्वाची भावना आणि उद्योजकतेस चालना देणारी वृत्ती यांबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली. यापूर्वी सन २००७ मध्ये सिंगापूर सरकारने सन्माननीय नागरिक पुरस्काराने सन्मानित केले होते. केवळ उद्योजक म्हणूनच नव्हे तर एक दानशूर आणि समाजाभिमुख व्यक्तित्व म्हणून सिंगापूरवासीयांच्या मनांत टाटांबद्दल आदर असल्याचे सिंगापूरचे शिक्षणमंत्री केट यांनी पदवी बहाल करताना नमूद केले. सिंगापूर विद्यापीठाचे १०० हून अधिक विद्यार्थी टाटा उद्योगसमूहातील कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी अभिमानाने सांगितले.