पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकीकरणाचा अभाव असल्याचा ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना भ्रम झाल्याची टीका पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी बुधवारी केली. पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकीकरणाचा अभाव असल्याची टिप्पणी रतन टाटा यांनी केली होती. त्याला मित्रा यांनी प्रत्युत्तर दिले.
रतन टाटा आता वयस्कर झाले आहेत आणि त्यांना भ्रम होताहेत. आजूबाजूला काय घडते आहे, हे त्यांना समजत कसे नाहीये, हेच मला कळत नाही, असे मित्रा पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सीआयआय परिषदेच्या पार्श्वभूमीवर मित्रा यांनी ही टीका केली.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात बोलताना रतन टाटा यांनी पश्चिम बंगालमध्ये औद्योगिक विकासाच्या खुणा दिसत नसल्याचे म्हटले होते. त्यावरून चिडलेल्या मित्रा यांनी टाटा यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये टाटा समूहातील टीसीएस ही कंपनी २० हजार नवी पदे भरणार आहे. त्याचबरोबर अनिल अंबानी समूह आणि इमामी हे दोन्ही राज्यात सिमेंटचे कारखाने उभारत आहेत. टाटा मेटिलिक्सनेही त्यांच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे.