प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी भारताने पाकिस्तानविरूद्ध घेतलेल्या कणखर भूमिकेचे कौतूक केले आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये नोव्हेंबरमध्ये होणा-या सार्क परिषदेवर भारताने बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले होते. मोदी सरकारच्या या निर्णयाची रतन टाटा यांनी प्रशंसा केली आहे. रतन टाटा यांनी बुधवारी ट्विटरवरून यासंदर्भातील मत व्यक्त केले. सार्क परिषदेवर बहिष्कार टाकण्याच्या भारत सरकारच्या ठाम भूमिकेचा अभिमान वाटतो. तसेच भारताच्या या निर्णयानंतर अन्य सदस्य राष्ट्रांनी सार्कवर बहिष्कार देऊन भारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे मन भरून आल्याचे रतन टाटा यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान या देशांनीही सार्क परिषदेवर बहिष्कार टाकल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्यामुळे ही परिषद रद्द होणार असल्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, पाकिस्तानने मात्र ही परिषद होणारच असा दावा केला आहे.

इस्लामाबादमध्ये ९ आणि १० नोव्हेंबर रोजी १९ वी सार्क परिषद पार पडणार होती. सार्क देशांमधील करारानुसार या परिषदेत आठपैकी एका देशानेही सहभागी होण्यास नकार दिला तर ही परिषद पुढे ढकलण्यात येते किंवा रद्द केले जाते. सध्याच्या वातावरणात चर्चा करणे योग्य नसल्याचे बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतानने सांगितले होते. या देशांनी त्यांचा निर्णय सध्या सार्क परिषदेचे अध्यक्षपद असलेल्या नेपाळला कळवला आहे. सार्कचे प्रमुख अर्जून बहादूर थापा हे सध्या न्यूयॉर्क दौ-यावर असून ते दोन दिवसांनी नेपाळमध्ये परततील. नेपाळमध्ये परतल्यावर ते परिषद पुढे ढकलायची किंवा रद्द करायची याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.