भोजपुरी चित्रपट अभिनेता रवी किशन यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अशोक रोड येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात त्यांनी  भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश घेतला. यावेळी भाजप खासदार आणि भोजपुरी गायक-अभिनेते मनोज तिवारी हे उपस्थित होते.  भारतीय जनता पक्ष हा गरिबांचा विचार करणारा पक्ष आहे. या पक्षाचे आणि माझे विचार समान आहेत त्यामुळे आपण या पक्षात प्रवेश केल्याचे रवी किशन यांनी म्हटले.

देशाचा विकास व्हावा असे मला वाटते. माझे राजकारण विकासापुरते मर्यादित असेल मी लोकांचा अपमान करण्यासाठी राजकारणात आलोनाही असे त्यांनी म्हटले. मनोज तिवारी आणि रवी किशन हे दोघे भोजपुरी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. रवी किशन यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्ष संघटना मजबूत होईल असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. रवी किशन यांची प्रतिमा स्वच्छ आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या रवी किशन यांनी अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भोजपुरी चित्रपट लोकप्रिय आहेत.

रवी किशन यांनी या आधी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. तर मनोज तिवारी यांनी दिल्लीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते विजयी झाले. तसेच त्यांना दिल्ली भाजपचे शहर अध्यक्ष पदही देण्यात आले. तेव्हापासून तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मोहीम सुरू केली होती. दारादारावर जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या बदद्ल लोकांना जागरुक करा असे तिवारी यांनी म्हटले होते. त्यांच्या या मोहीमेचे नाव पोल खोल असे होते. रवी किशन यांच्या भाजप प्रवेशामुळे संघटनेला बळकटी मिळेल असे तिवारी यांनी म्हटले. विकास हा आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असेल. आजकाल लोक एकमेकांवर टीका करताना दिसतात. त्यावेळी राजकारणाचा केंद्रबिंदू सरकला आहे की काय ? असे वाटते, परंतु मी कुणाचाही अपमान करण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी भाजपमध्ये आलो नाही असे त्यांनी स्पष्ट केले.