यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम हरित निकषांचे उल्लंघन केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरी त्याबद्दल दंड न भरण्याच्या भूमिकेचा रविशंकर यांनी पुनरुच्चार केला आहे.

ज्या ठिकाणी म्हणजेच यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तेथील जागा पूर्ववत करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय हरित लवादाने आर्ट ऑफ लिव्हिंगला जी रक्कम भरण्याचा आदेश दिला आहे ती रक्कम दंड नसून पूरप्रवण क्षेत्र पूर्ववत करण्यासाठी आहे, असेही रविशंकर म्हणाले. आपण निष्कलंक आयुष्य जगलो, कधीही दंड भरला नाही, एक पैसाही दंड भरलेला नाही, त्यामुळे दंड भरणार नाही, असे आपण म्हणालो. तेव्हा हा दंड नाही असे सांगण्यात आले, वृत्तपत्रांमध्ये चुकीचे वृत्त आले, असे ते म्हणाले. ही रक्कम पूरप्रवण क्षेत्राच्या विकासासाठी असल्याचे सांगण्यात आले आणि त्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा राहील.