एकीकडे सर्व विमान कंपन्यांची प्रवासबंदी आणि दुसरीकडे दिल्ली पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नांचा गुन्हा

इकॉनॉमी श्रेणीमध्ये बसविल्याच्या रागातून एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला चपलीने मारहाण करणारे उस्मानाबादचे शिवसेना खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्याविरुद्ध शुक्रवारी चांगलाच फास आवळला गेला. एकीकडे त्यांच्यावर हवाईप्रवासबंदी घालण्याचा निर्णय एअर इंडियासहित भारतीय विमान कंपन्यांच्या महासंघाने (फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स : ‘एफआयए’) घेतला, तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याला तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

‘आम्ही खासदार गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानातील कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न : ‘कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउटिंग टू मर्डर’) आणि ३५५ (गुन्हेगारी हेतूने अप्रतिष्ठा) नुसार गुन्हा दाखल केला आणि सखोल चौकशीसाठी तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (क्राइम ब्रँच) सोपविला आहे,’ अशी माहिती दिल्ली पोलिसाचे प्रवक्ते दीपेंद्र पाठक यांनी रात्री पत्रकार परिषदेमध्ये दिली.

गायकवाडांचीही तक्रार

दरम्यान, दुसरीकडे गायकवाड यांनीही सुकुमार आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संसद मार्ग पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदविली. त्यामध्ये शिवीगाळ करण्याचा, अप्रतिष्ठा करण्याचा आणि धमकी देण्याचा आरोप आहे. तक्रार देताना गायकवाड यांच्यासोबत चंद्रकांत खैरे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे आदी खासदार उपस्थित असल्याचे समजते.

बिझनेस श्रेणीचे तिकीट असतानाही पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान एअरम् इंडियाच्या (एआय- ८५२) विमानात इकॉनॉमी श्रेणीत बसविल्यावरून गायकवाड यांनी गुरुवारी सुकुमार या व्यवस्थापकाला चपलीने बडविण्याची घटना घडली होती. त्या घटनेचे पडसाद शुRवारी दिवसभर उमटत होते. झालेल्या घटनेबद्दल गायकवाड बिनधास्त होते. ‘मी आणि माफी? माफी तर त्या अधिकाऱ्याने मागितली पाहिजे. त्यांचे वय साठ असले म्हणून काय झाले? मी फक्त (शिवसेना पक्षप्रमुख) उद्धव ठाकरेंचेच ऐकेन. पोलिसांनी मला खुशाल अटक करावी. मी कुणालाही घाबरत नाही.. मी शिवसैनिक आहे,’ असे त्यांनी कस्तुरबा गांधी रस्त्यावरील नवीन महाराष्ट्र सदनात जमलेल्या माध्यमांच्या गर्दीला सांगितले. ‘दिल्ली-पुणे प्रवासाचे मी तिकीट काढले आहे. बघू या मला ते कसे काळ्या यादीत टाकताहेत? त्यांनी मला विमानात चढण्यापासून रोखून दाखवावे,’ असेही ते म्हणत होते.

पण संतप्त एअर इंडियाने त्यांचे तिकीटच रद्द केले. त्यानंतर ‘फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स’नेही (एफआयए) त्यांच्यावर हवाईप्रवासाची बंदी घालण्याचा निर्णयम् जाहीर केला. ‘एफआयए’ही खासगी विमान कंपन्यांची सर्वोच्च संस्था आहे. जेट, इंडिगो, गो आणि स्पाइसजेट हे तिचे सदस्य आहेत. याशिवाय विस्तारा आणि ‘एअर एशिया’नेही गायकवाडांना ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला.  त्याचवेळी ‘एफआयए’ने कोणावरही हवाईप्रवास बंदी घातली नसल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. त्यामुळे काही काळ संभ्रम होता. त्याचसुमारास गायकवाडांच्या ट्रॅव्हल एजंटने सायंकाळी साडेपाचच्या विमानाचे काढलेले तिकीट ‘इंडिगो’ने तातडीने रद्द केले. पण नंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना ‘एफआयए’चे सहायक व्यवस्थापक उज्ज्वल डे यांनी हवाईबंदी घातल्याचे स्पष्ट केले. आणखी काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

दुसरीकडे सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या घरी काही खासदारांची अनौपचारिक बैठक झाली. त्यात श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह आणखी काही खासदार सहभागी होते. काही वकिलांचा त्यावेळी सल्ला घेण्यात आला. पण बैठकीचे वृत्त सावंतांनी स्पष्टपणे फेटाळले. मिळालेल्या माहितीनुसार, या मुद्दय़ावरून सोमवारी संसदेमध्ये खासदारावरील अन्यायाचा मुद्दा आRमकपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर एअरम् इंडियाचे प्रमुख अश्विनी लोहानी यांना भेटण्याचेही ठरविण्यात आले.

हवाईबंदीचे टोक केंद्राला अमान्य?

गायकवाड यांच्या मारहाणीच्या कृतीचा केंद्राने निषेध केला असला तरी त्यांच्यावर हवाईप्रवासबंदी घालण्यास मात्र केंद्राचा विरोध असल्याचे दिसते आहे. ‘एखाद्याने गुन्हा केल्यास त्याला शिक्षा व्हावी. पण त्याला विमान तिकीट नाकारणे चुकीचे आहे. कोणालाही तिकीट नाकारण्याचा अधिकार देणारा कायदा देशात नाही,’ असे केंद्रीय विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांनी स्पष्ट केले. नागरी हवाई खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हांनीही तशीच भूमिका घेतली. ‘गायकवाड यांना प्रवास करू देण्यास विमान कंपन्या कदाचित तयार नसाव्यात. पण कोणतीही कृती सर्वसाधारण कायदे व विमानवाहतूक विषयक कायद्याच्या चौकटीतच असली पाहिजे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘गायब’ खासदार दिसले ते थेट टीव्हीवरच

औरंगाबाद: ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ या शब्दामध्ये ज्यांची ओळख सांगितली जात होती ते खासदार रवींद्र गायकवाड अचानक काल झळकले ते विमानातील मारहाणीतच. निवडून आल्यापासून ते गायब आहेत. कोणाशीच संपर्कात नसतात, असे सांगणारे त्यांच्या पक्षात अधिक आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तर खासदारांचे दर्शन होत नसल्याने ‘ते कोठे आहेत’, असा प्रश्न विचारणेही मतदारांनी सोडून दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यावे म्हणून आवाहन केले होते. गायकवाड यांनी खसगी हे गाव आदर्श करण्यासाठी निवडले. पण दोनदा चक्कर मारुन गेलेले खासदार पुन्हा परतलेच नाहीत, असे नागरिक सांगतात. त्यांना भेटणे अथवा त्यांच्याशी संपर्क होणे हेच एक आव्हान असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांच्याकडून मतदारसंघातील नागरिकांचे काम होण्याची शक्यता नाही, असे सांगण्यात येते. अचानक न दिसणारे खासदार टीव्हीमध्ये दिसल्याने ते दिल्लीमध्ये जातात हे तरी समजले, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने दिली.