एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांचे लेजियन या हॅकर्स ग्रूपने ट्विटर अकाऊंट हॅक केले होते. रविश कुमार यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून या हॅकर्सना व अप्रत्यक्षपणे प्रशासकीय व सध्याच्या राजकीय परिस्थितीलाही टोला लगावला आहे. लोकांनी सध्याच्या राजकीय वातावरणात पासवर्डच नव्हे तर राजकीय निष्ठा ही वारंवार बदलत राहावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. मला घाबरणाऱ्या व्यक्तीनेच भाडोत्री लोकांची मदत घेऊन माझं ट्विटर अकाऊंट हॅक केले असून त्यांनीच माझ्या अकाऊंटवर येऊन मला शिव्याशाप देण्याचा प्रकार केला आहे. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षांपासून मी ट्विटर वापरणे बंद केलं आहे. वर्षभरात एकही ट्विट केलेले नाही. माझ्या अकाऊंटवर मी लिहिलेलं कमी आणि त्या अभ्रद लोकांनी लिहिलेल्या वाईट गोष्टीच जास्त आहेत. या लोकांनी मला घाबरू नये. त्यांनी मी तिथे जे काही लिहिलं आहे, ते वाचावं. माझा इ-मेल हॅक करून माझ्या स्वातंत्र्यवर घाला घालण्यात आला आहे. माझ्या ज्येष्ठ सहकारी बरखा दत्त यांच्याही स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार आहे. मी फक्त रविश कुमार नसून एक पत्रकार ही आहे. आमच्या इ-मेलमध्ये कोण इतका रस दाखवतोय असा सवाल करत ते आम्हाला घाबरवण्यासाठी तर करत नाहीत ना, असे त्यांनी म्हटले आहे.

आमचं अकाऊंट हॅक करून अप्रत्यक्षपणे सामान्य नागरिकांनाच धमकी देण्याचा हा प्रकार आहे. पत्रकारांना जे घाबरवतात त्यांचा उद्देश हा जनतेला घाबरवण्याचा असतो. लोकांनी याच्याविरोधात बोलणे गरजेचे आहे. एखाद्या खोलीत बसून असे कृत्य करणाऱ्या डरपोक लोकांची सध्या टोळी बनली आहे. हे कोणी केलंय हे कोणालाच माहीत नाही. राहुल गांधीच्या प्रकरणात अजून काहीच माहिती हाती लागू शकली नाही. मग तिथे आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीचं काय ? आमच्या ट्विटर अकाऊंटवर येऊन शिव्याशाप देणारे हे लोक कोण आहेत असा उद्विग्न सवाल त्यांनी या वेळी विचारला आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे हे कृत्य तर नाही ना किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीचा समर्थक ? याचा शोध तुम्हाला घ्यावा लागणार आहे.
जर एखाद्याने तुमचा पासवर्ड चोरला व तुमच्या इ-मेल अकाऊंटमध्ये हस्तक्षेप केला तर तुम्हाला कसं वाटेल. तुम्हाला अशी सायबर आणि राजकीय संस्कृती हवीय का, असा सवाल त्यांनी सामान्य जनतेला विचारला आहे. भारत सायबर सुरक्षेत कमजोर असल्याचे हे उदाहरण असल्याचे त्यांनी आरोप केला आहे. पोलिसांना अजून या हॅकर्सची माहिती काढण्यात अपयश आले असून एखाद्या गल्लीतील नेत्याबाबत असं घडलं असतं तर एक-दोघांना अटकही करण्यात आली असती, असा टोलाही त्यांनी लगावला. माझं फक्त लिखाणच लुटले गेले आहे. जर एखाद्या गरीब जनतेची कमाई लुटली गेली असती तर माध्यमेही तिथे गेले नसते, असे म्हणत माध्यमांवरही निशाणा साधला.
गेल्या अडीच वर्षांपासून आपण अशी राजकीय गुंडगिरी अनुभवत असल्याचे सांगत केंद्रातील भाजप सरकारवरही अप्रत्यक्षपणे टीका केली. रविश कुमार यांचे अकाऊंट हॅक केल्यानंतर काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती. त्यांचाही त्यांनी समाचार घेतला. गेल्या अडीच वर्षांपासून हे फुटकळ नेते आपल्या मागे लागले आहेत. सध्याचे राजकीय वातावरण हे खूप भयानक असून पुढील पिढी तर यापेक्षाही वाईट परिस्थितीत असेल. सायबर विश्वात आणि राजकारणात सुरक्षित राहायचे असेल तर तुम्हाला इतकंच करावं लागेल की, पासवर्डच नव्हे तर राजकीय निष्ठा ही वारंवार बदलत राहा आणि इतकंच करा, असेही त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.