अर्थमंत्र्यांकडून रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांची पाठराखण

रिझव्‍‌र्ह बँक जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांची सुसंगती लावत असून जमा नोटांच्या संख्येतील अचूकता पडताळली जात आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांची पाठराखण केली.

जुन्या जमा नोटांची गणती अद्याप सुरू असल्याचे उत्तर रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी संसदीय समितीला दिले होते. बँकांकडे किती जुन्या नोटा आल्या याबाबत खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेला गव्हर्नरांची माहिती नाही, अशी टीका त्यानंतर झाली होती.

संसदेत मंगळवारी नोटाबंदीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली यांनी पटेल यांच्याच उत्तराचे समर्थन केले. जेटली म्हणाले की, जमा झालेल्या नोटांबाबत रिझव्‍‌र्ह बँक अद्याप पडताळणी करत असून सरकारची या प्रक्रियेवर नजर आहे.

नोटा मोजण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेला आवश्यक संख्येत यंत्रे पुरविण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी राज्यसभेला दिले.

नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा जुन्या नोटांची संख्या लक्षणीय वाढली; यानंतर प्राप्तिकर विभागानेही शोधमोहीम राबविली, असेही जेटली म्हणाले. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान डिजिटल व्यवहारांमध्येही वाढ होऊन ही संख्या ७१.२७ कोटींवरून १२३.४६ कोटींवर गेल्याचे अर्थमंत्री म्हणाले.