काळा पैसा आणि बनावट चलन रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने २००५ पूर्वीच्या सर्व नोटा एप्रिलपासून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्या चलनात असलेल्या त्या वर्षांपूर्वीच्या आणि त्यानंतरच्या अशा सर्वच नोटांकडे बघण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. आपल्या खिशात वा पाकिटात खुळखुळणाऱ्या नोटांविषयी उत्सुकता असणे स्वाभाविकच. त्यावर टाकलेला प्रकाशझोत.

नोटा कुठे तयार होतात ?
* भारताची मध्यवर्ती बँक असणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेकडे नोटा चलनात आणण्याचे सर्वाधिकार आहेत. या बँकेच्या मागणीनुसार वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटांची छपाई करण्याच्या उद्देशाने चलार्थ पत्र मुद्रणालयाची स्थापना करण्यात आली. देशात नोटांची छपाई करणारी एकूण चार मुद्रणालये आहेत. त्यातील नाशिक व देवास येथील मुद्रणालय केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत तर साल्बोनी व म्हैसूर येथील मुद्रणालये रिझव्‍‌र्ह बँकेची आहेत. नोटांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरुन काढण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने स्वत:ची उपरोक्त दोन मुद्रणालये सुरू केली. नाणी तयार करण्याची जबाबदारी चार टांकसाळींवर आहे. मुद्रणालय व टांकसाळ यावर रिझव्‍‌र्ह बँकेचे पूर्णत: नियंत्रण असते.
* दरवर्षी मुद्रणालयांनी किती नोटांची छपाई करायची हे रिझव्‍‌र्ह बँक निश्चित करते. त्यानुसार प्रत्येक मुद्रणालयाला विशिष्ट लक्ष्य देण्यात येते. कधी एखादे मुद्रणालय लक्ष्य गाठण्यात यशस्वी होते तर कधी ते त्यापासून वंचित राहतात.
* नाशिकच्या मुद्रणालयाने जानेवारी २०१३ या महिन्यात ४५१.५ ‘मिलियन’ इतक्या विक्रमी नोटांची छपाई करून स्थापनेपासून आतापर्यंतचे मासिक नोटा छपाईचे सर्व उच्चांक मोडीत काढले. म्हणजे दरमहा इतक्या प्रचंड संख्येने या ठिकाणी नोटांची छपाई केली जाते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या दोन मुद्रणालयांची वार्षिक १६ ‘बिलियन’ नोटा छापण्याची क्षमता आहे. या मुद्रणालयांमध्ये दोन सत्रात काम चालते.
मुद्रण प्रक्रियेतील सुरक्षा निकष
* देशाची अर्थव्यवस्था डळमळीत करण्यासाठी बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रयत्न काही घटकांकडून होत असतात. बनावट चलनामुळे निर्माण झालेले धोके लक्षात घेऊन नोटांची छपाई करताना गोपनियता बाळगून सुरक्षा निकषांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. मुद्रण प्रक्रियेतह सुरक्षा निकषांचा समावेश असतो. त्यात आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल केले जातात.
* नोटांचे संकल्पन, छपाई व वितरण प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मुद्रणासाठी अत्याधुनिक छपाई यंत्रणा, तितकीच उच्चतम दर्जाची शाई असे घटक वापरताना त्यांची विश्वासार्हता जोखून घेण्यात येते. प्रकाशनीयदृष्टय़ा अस्थिर भासणारी अशी विशेष शाई ५०० व १००० रुपयांच्या छपाईत वापरली जाते. काही विशिष्ठ ठिकाणी ‘फ्लोरोसन्ट’ (चमकणारी) शाईचाही वापर केला जातो. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे छपाई, कटींग आणि नोटांचे बंडल तयार करण्यासारखी सर्वच कामे जलद पार पडतात. उत्पादनात सुरक्षितता आणि गोपनियतेला महत्तम प्राधान्य
देण्यात येते.
* दहा रुपयांची नोट वगळता इतर सर्व नोटांवर ओळख चिन्ह, प्रत्येक नोटेवर ‘आरबीआय’ हे अतिसुक्ष्म अक्षर जे केवळ भिंगातून पहाता येते. नोट तिरकी वा सरळ धरून पाहिल्यावर अनुक्रमे हिरव्या व निळ्या रंगात दिसणारे तिचे मूल्य अर्थात ‘लेटंट’ तंत्रज्ञान, महात्मा गांधी यांचे छायाचित्र असणारे ‘वॉटर मार्क’, वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटेवरील सुरक्षा धाग्यावर ‘भारत’ (हिंदी भाषेत) तर ‘आरबीआय’ ही सुक्ष्म नोंद आदी वेगवेगळे सुरक्षा निकष हा मुद्रणातील महत्वपूर्ण भाग असतो. सातत्याने त्यात वेगवेगळे निकष समाविष्ट करून बदल केले जातात.
* छपाई झालेल्या सर्व नोटा मुद्रणालयाकडून रिझव्‍‌र्ह बँकेकडे जातात. या नोटांच्या वितरणासाठी या बँकेची देशभरात १९ उप विभाग कार्यरत आहेत. या कार्यालयांमार्फत शासकीय कोषागार, त्या त्या भागातील बँकांना नोटा उपलब्ध करून
दिल्या जातात.
नोटांचा कागद
* एखादी नोट चलनात आली म्हणजे ती किती जणांकडून हाताळली जाणार हे सांगणे अवघड. त्यामुळे कागदाची निवड करताना तो उच्चतम प्रतिचा राखला जातो. कारण, या कागदावरच काहीअंशी नोटेचे आयुर्मानही अवलंबून असते. दैनंदिन व्यवहारात मोठय़ा प्रमाणात हाताळल्या गेलेल्या नोटा अखेर जीर्ण होतात. उच्च गुणवत्तेच्या नोटांसाठी लागणारा कागद अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील होशंगाबादची सुरक्षा पेपर मील तयार करते. असा कागद बनविणारी देशातील ही एकमेव पेपर मील आहे.
* या पेपर मीलची स्थापना झाली असली तरी दरवर्षी नोटांसाठी लागणाऱ्या संपूर्ण कागदाची गरज ती भागवू शकत नाही. त्यामुळे आजही उच्चतम दर्जाचा कागद परदेशातून आयात करावा लागतो. नोटांसाठी वॉटर मार्क असणारा कागद अद्याप देशात तयार केला जात नाही. वॉटरमार्क कागदचा प्रकल्पस्थापण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
भारतातील नोटांचा प्रवास
प्राचीन काळापासून भारतातही देवाणघेवाणीसाठी विविध धातूंपासून बनवलेल्या नाण्यांचा वापर केला जात होता. छोटय़ा छोटय़ा साम्राज्यांची स्वत:ची अशी चलनव्यवस्था होती. १८ व्या शतकात भारतातही कागदी नोटांचा वापर सुरू झाला. इंग्रजांच्या आगमनानंतर संपूर्ण देशात एकच चलन असावे या दृष्टीने १८३५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात रुपया चलनात आणला. साधारणत: १९०३ ते १९११ या काळात ५,१०,५० आणि १०० रुपयांच्या नोटाही अस्तित्वात आल्या. जानेवारी १९३८ मध्ये जॉर्ज-६चे छायाचित्र असलेली पाच रुपयांची नोट अस्तित्वात आली. त्यानंतर लागोपाठ १० रुपये, १०० रुपये, एक हजार आणि १० हजाराची नोट बाजारात आली. १९४७ पर्यंत जॉर्ज -६ चे छायाचित्र नोटांवर होते. मात्र देश स्वातंत्र्य झाल्यानंतर १९५० पर्यंत या नोटा थांबवण्यात आल्या. स्वतंत्र भारताच्या नव्या नोटा चलनात आल्या. या नोटांवर महात्मा गांधींचे छायाचित्र आणि अशोक स्तंभ आदी छापण्यात येऊ लागल्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने विशिष्ट चिन्हांचा वापर सुरू झाला.
जगभरात अद्याप कागदापासून केलेल्या नोटांचाच सर्वाधिक वापर होत आहेत. मात्र या नोटांबाबत असलेले संभाव्य धोके  लक्षात घेऊन १९८३ च्या सुमारास पॉलिमर नोटा उदयास आल्या.  या नोटांवर हवामानाचा परिणाम होत नाही. अनेक विशिष्ट शाईंचा वापर नोटेच्या दोन्ही बाजूला केला जात असून सुरक्षेच्या दृष्टीनेही अधिक काळजी घेण्यात आली आहे. या पॉलिमर नोटा
दीर्घकाळ टिकणाऱ्या तसेच चक्क धुता येण्यासारख्या आहेत.

अशा ओळखता येतील बनावट नोटा
*  प्रत्येक नोट छापताना त्यावर ‘फ्लायर मार्क’ असतो. खऱ्या नोटेवरील या चिन्हाच्या मधोमध टाचणी टोचल्यास ती दुसऱ्या बाजुनेही चिन्हाच्या मध्यावर तंतोतंत छिद्र करते. बनावट नोटेत अशी तंतोतंतता आढळून येत नाही.
*  खऱ्या नोटेत ‘लेटंट इमेज’ तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने ही नोट तिरकी धरल्यास नोटेचे मूल्य हिरव्या रंगात दिसते. तर हीच नोट सरळ धरल्यास हे मूल्य निळसर रंगात दिसते. खोटय़ा चलनाबाबत असे आढळत नाही.
*  सुरक्षा धागा हा खऱ्या नोटेवरील सर्वाधिक महत्वाचा भाग समजला जातो. १०० रुपये व त्यापुढील मूल्यांच्या नोटेवर हा धागा एका बाजुने पाहिल्यास सरळ रेषेत तर दुसऱ्या बाजूने खंडित स्वरूपात दिसतो. बनावट नोटेत मात्र दोन्ही बाजुंचा धागा सरळ रेषेसारखाच दिसतो.
*  सर्व नोटांवर महात्मा गांधींचे चित्र असले तरी खऱ्या चलनात या चित्राबरोबरच नोटेवरील कोऱ्या जागेत गांधीजींची प्रतिमा असते. ‘वॉटरमार्क’च्या सहाय्याने उमटविण्यात आलेली ही प्रतिमा नोट जमिनीला समांतर धरून पाहिल्यास केवळ रेषाकार दिसते, तर तीच नोट प्रकाशाच्या दिशेने उभी धरल्यास त्यात गांधीजींचा संपूर्ण चेहरा दृष्टिस पडतो. खोटय़ा नोटेच्या बाबतीत असा प्रकार दिसून येत नाही.
*  खऱ्या नोटांच्या आकारात कधीच फरक पडत नाही. मात्र, खोटय़ा नोटांच्या आकारात अनेकदा तफावत दिसून येते.