अद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशीकला यांना तुरूंगात व्हीआयपी सेवा पुरवण्यात येत असल्याची बाब उघड करणाऱ्या कर्नाटकातील कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक (डीआयजी) डी. रूपा यांची थेट वाहतुक विभागात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी कर्नाटकच्या गृहविभाग आणि कारागृह विभागाचे पोलिस महासंचालक एच. एन. सथ्यनारायण राव यांच्यावर आरोप करीत डी. रूपा यांनी अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शशिकला या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या सहकारी होत्या. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्या सध्या बंगळूरू येथिल पारापन्ना आग्रहरा मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भागत आहेत. मात्र, या ठिकाणी त्यांन व्हीआयपी सेवा मिळत असल्याचे समोर आले आहे. ही बाब समोर आणणारा अहवाल रूपा यांनी सादर केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची कुर्हाड कोसळली आहे. या प्रकरणी गृहविभागाला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, शशिकला यांच्यासाठी तुरूंगात जेवण बनवण्यासाठी खास स्वयंपाकघर पुरवण्यात आले होते. तसेच नातेवाईकांना निवांत भेटण्यासाठी भरपूर वेळ देण्यात येत होता, यासाठी तुरुंगाधिकाऱ्यांना तब्बल २ कोटी रूपयांची लाचही देण्यात आली होती.

या प्रकरणाची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दखल घेतली. मात्र, डी. रूपा यांच्यावरील कारवाई ही प्रशासनाच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. उलट, प्रत्येक प्रकरणे ही माध्यमांना सांगणे गरजेचे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
[jwplayer HCfxThG9]