रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोबाइल ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव करत जिओ ४ जी सेवेची घोषणा केली. जिओ ४ जी बाजारात येण्यापूर्वीच अनेक प्रस्थापित कंपन्यांचे धाबे दणाणले होते. अंबांनी यांनी जिओची घोषणा करताच एअरटेल, आयडिया व रिलायन्स कम्युनिकेशनचे शेअर्स धडाधड कोसळले. अवघ्या पाऊण तासात या कंपन्यांचे सुमारे १५ हजार ८४० कोटींचा तोटा झाला आहे.
गुरुवारी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स जिओच्या फोर जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. जिओच्या ग्राहकांना देशभरात रोमिंग फ्री, मोफत व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा आणि अत्यल्प दरात फोर जी डेटा सुविधा अशा आकर्षक सवलतींची बरसातच त्यांनी या सोहळ्यात केली. जिओच्या ग्राहकांना एक जीबी डेटासाठी फक्त ५० रुपये भरावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. जिओमुळे भारताला स्वस्त दरात उत्तम दर्जाची इंटरनेट सुविधा मिळणार आहे. जेवढा डेटा तुम्ही जास्त वापराल तेवढे कमी पैसे तुम्हाला मोजावे लागतील, असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या या घोषणांचा परिणाम मुंबई शेअर बाजारात दिसून आला.
भारती एअरटेल, आयडिया सेल्यूलर या टेलिकॉम कंपन्यांचे शेअर कोसळले. एअरटेलचे दर ८.९९ टक्क्यांनी घसरून प्रति शेअर ३०२ रूपयांवर स्थिरावले. आयडियाच्या शेअर्समध्ये ९.०९ टक्क्यांनी घट होऊन ते प्रति शेअर ८५ रूपयांपर्यंत खाली आहे. गेल्या ५२ आठवड्यातील आयडियाचा हा सर्वात निचांकी दर आहे. अंबानी यांच्या ४५ मिनिटांच्या भाषणादरम्यान एअरटेलचं भांडवली बाजारातील मूल्य १२ हजार कोटींनी घटले. आयडियाच्या बाजारमूल्यात ३०३० कोटींची घसरण झाली. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनचे शेअर्स ६.४९ टक्क्यांनी घसरून ५०.४० रूपयांवर आले. त्यांनी ८७२ कोटी गमावले.