स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला आवाहन

‘भारतीय जनता व सरकार यांनी हातात हात घालून, एकदिलाने देशाच्या नवनिर्माणासाठी काम करावे. हे काम करताना मानवतावादी दृष्टिकोन सदैव जागता ठेवावा आणि कुठल्याही धार्मिक वा लैंगिक भेदभावांना थारा न देणाऱ्या नव-भारताची निर्मिती करावी’, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी देशवासीयांना उद्देशून केले. ‘मानवतावादी दृष्टिकोन हा देशाच्या जनुकांमध्येच आहे’, असेही ते म्हणाले.

राष्ट्रपतिपद स्वीकारल्यानंतरचे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केलेले रामनाथ कोविंद यांचे हे पहिलेच भाषण. असहिष्णुतेच्या वाढत्या घटना, टोकदार होत चाललेल्या धार्मिक-जातीय अस्मिता अशा पाश्र्वभूमीवर कोविंद यांनी आपले विचार मांडले. ‘प्रत्येक कुटुंबासाठी निवारा, मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा, चांगले रस्ते, दळणवळण यंत्रणा, अत्याधुनिक रेल्वे जाळे आणि वेगाने होणारा व शाश्वत विकास आदी भारताच्या नवनिर्माणाचे निकष आहेत. देशातील नागरिक आणि सरकार यांच्यातील सहभाग यामुळे भारताच्या नवनिर्माणाचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल’, असा विश्वास कोविंद यांनी व्यक्त केला.

‘धोरणे आणि कृती यांबाबतची नैतिक मूल्ये, ऐक्य आणि शिस्त यावर विश्वास, संस्कृती आणि विज्ञान यावरील विश्वास, शिक्षण आणि कायद्याच्या राज्याला प्रोत्साहन या बाबी जनता आणि सरकार यांच्यात असणे आवश्यक आहे’, असे सांगत, ‘नागरिक आणि सरकार, व्यक्ती आणि समाज, कुटुंब आणि व्यापक समाज यांच्या नात्यांतूनच भारत घडला आहे’, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

‘देशातील मोठय़ा शहरांमध्ये आपण शेजाऱ्याला ओळखत नाही. शहरे असो अथवा गाव एकमेकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपला समाज आनंदी होईल आणि एकमेकांना सहानुभूतीने जाणून घेता येईल. सहानुभूती, सामाजिक सेवा आणि स्वयंसेवीपणा भारतात अद्यापही जिवंत आहे’, असे उद्गार कोविंद यांनी काढले.

‘मोदी सरकारने एलपीजी अनुदान, नोटाबंदी, वस्तू-सेवा करकायदा, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छ भारत आदी मुद्दय़ांवर मोलाची पावले टाकली असून, त्याच्या यशासाठी नागरिक आणि सरकार यांच्यात ताळमेळ आवश्यक आहे’, असे कोविंद म्हणाले. वस्तू-सेवा कराची अंमलबजावणी सुरळीत सुरू झाल्याबद्दल कोविंद यांनी आनंद व्यक्त केला. ‘आपण जो कर देतो त्याचा वापर देशाच्या उभारणीसाठी होणार आहे ही अभिमानास्पद बाब आहे’, असे ते म्हणाले.

जवाहरलाल नेहरूंच्या योगदानाचा उल्लेख

राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणात रामनाथ कोविंद यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे काँग्रेसने टीका केली होती. मात्र सोमवारच्या भाषणात कोविंद यांनी, स्वातंत्र्य चळवळीत पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. ‘आपल्याला ज्या पिढीने स्वातंत्र्य मिळवून दिले त्यामध्ये देशाच्या सर्व भागांतील महिला आणि पुरुषांचा त्याचप्रमाणे राजकीय आणि सामाजिक विचारधारांचा सहभाग होता’, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यसैनिकांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

सरकारच्या धोरणांचे लाभ समाजातील सर्व घटकांना मिळतील याची खातरजमा करण्यासाठी आपण सर्वानी एकदिलाने काम केले पाहिजे. मुलींना दुजाभावाची वागणूक न देता त्यांनाही उच्चशिक्षित केले पाहिजे, २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असून भविष्यातील भारत कनवाळू वृत्तीचा असला पाहिजे.

– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती