धावत्या बसमध्ये युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणखी दोघांना शुक्रवारी अटक झाली असून त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे. शुक्रवारी अटक झालेल्यांपैकी एकजण उत्तर प्रदेशातील बदायू येथील असून त्याचे वय पडताळणीचे काम सध्या सुरू आहे, असे दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी सांगितले. दुसरा आरोपी अक्षय ठाकूर यास बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्य़ातील लखनकर्मा गावात अटक झाली.  
मुकेश या आरोपीस पीडित मुलीच्या मित्राने ओळखल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. केवळ मुकेशनेच ओळख परेडमध्ये उभे राहण्याची तयारी दर्शवली होती. तर राम सिंग, पवन आणि विनय या तिघांनी त्यास नकार दिला होता.    
प्रकृती अद्यापही अस्थिर
नवी दिल्लीत धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कारास बळी पडलेल्या ‘त्या’ युवतीची प्रकृती अद्यापही अस्थिर आहे. तिच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार असून तिला अद्यापही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती सदफरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय पर्यवेक्षक बी. डी. अथानी यांनी दिली.
मित्राची प्रथमच रुग्णालयाला भेट
धावत्या बसमध्ये बलात्कारग्रस्त ठरलेल्या मुलीच्या मित्राने शुक्रवारी सफदरजंग रुग्णालयात जाऊन आपल्या मैत्रिणीची पहिल्यांदाच भेट घेतली. मुलीचा हा मित्र सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, त्याप्रसंगी तिला नराधमांपासून वाचवण्यासाठी त्याने शर्थीचे प्रयत्न केले होते. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास माझ्या बहिणीच्या मित्राने रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली. रविवारच्या दुर्दैवी घटनेनंतर दोघेही प्रथमच एकमेकांना भेटले. सुमारे पाच मिनिटे त्याने तिच्याशी वार्तालाप केला, असे या मुलीच्या भावाने सांगितले.
माझ्या बहिणीने तिच्यावर उपचार सुरू असताना व ती शुद्धीत असताना प्रत्येक वेळी आपल्या या मित्राच्या प्रकृतीची प्राथमिकतेने चौकशी केली. तिच्या मित्राने भेटीदरम्यान सर्व आरोपींना पकडल्याची माहिती तिला दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. या सर्वाना कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्यात येईल, त्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत, असे तिला सांगितल्यावर तिला बरे वाटल्याचे तिचा भाऊ म्हणाला.
आपल्या बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्या तोंडात नळी घालण्यात आली असूुन कागदावर लिहून अथवा इशारा करून ती वैद्यकीय अधिकारी व आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधत आहे, असे तिचा भाऊ म्हणाला.