भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील मैत्रिपूर्ण संबंधांमध्ये पाकनिर्मित दहशतवादाचा असलेला अडथळा त्या देशाने दूर केला पाहिजे. शांततेचा मार्ग कधीच एकतर्फा असू शकत नाही. तो दुतर्फाच असतो, या शब्दांत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे मत मोदी यांनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
शांततेचा रस्ता हा दुतर्फा असला पाहिजे. आम्ही एक पाऊल पुढे टाकण्यास तयार आहोत, पण तुम्हीही प्रतिसाद दिला पाहिजे. भांडत बसण्यापेक्षा एकत्र येऊन गरिबी विरोधात लढायला हवे, अशी आमची आधीपासून भूमिका राहिली आहे, असे मोदी मुलाखतीत म्हणाले. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात त्यांच्यापरिने पूर्ण प्रयत्न करावेत. आम्ही दहशतवादाबाबत अजिबात तडजोड करणार नाही. भारतावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तान ठोस कारवाई करत नसल्याने द्विपक्षीय संबंध सुधारण्याला मर्यादा येतात. शांतता आणि शेजारी राष्ट्रांसोबत चांगल्या संबंधांसाठी आमचे सरकार स्थापनेच्या पहिल्यादिवसापासूनच प्रयत्नशील असल्याचेही मोदी पुढे म्हणाले.