दिल्लीतील बाबर रस्त्याचे नाव बदलण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. बाबर रस्त्याचे नाव बदलून उमर फयाझ रस्ता असे करण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. यासाठी दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार मीनाक्षी लेखी आणि एनडीएमसीला पत्र लिहिले आहे.

‘संपूर्ण देश लेफ्टनंट उमर फयाझ यांच्या हौतात्म्यामुळे शोकमग्न आहे. काश्मीरमधून दहशतवाद मुळासकट उखडून फेकण्यासाठी उमर फयाझ यांनी लष्करात प्रवेश केला होता. उमर फयाझ यांनी अतुलनीय शौर्य दाखवत देशासाठी प्राणांचे बलिदान दिले,’ असे तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ‘उमर फयाझ यांनी देशातील तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे उमर फयाझ यांना वंदन करण्यासाठी नवी दिल्लीतील बाबर रस्त्याचे नाव बदलून लेफ्टनंट उमर फयाझ रस्ता असे करण्यात यावे,’ अशी मागणी तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी पत्रातून केली आहे.

नवी दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये येणारा बाबर रस्ता पालिकेच्या अखत्यारित येतो. या रस्त्याला शहीद लेफ्टनंट उमर फयाझ यांचे नाव देण्याची मागणी दिल्ली भाजपने केली आहे. ‘बाबर रस्त्याला लेफ्टनंट उमर फयाझ यांचे नाव दिले गेल्यास त्याचे हौतात्म्य लोकांच्या कायम स्मरणात राहिल. या रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणांना यामुळे प्रेरणा मिळेल,’ असे दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी पत्रात म्हटले आहे.

शहीद उमर फयाझ राजपुताना रायफल्समध्ये लेफ्टनंट पदावर कार्यरत होते. काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या उमर फयाझ यांनी लष्करात प्रवेश केल्यावर पहिल्यांदाच सुट्टी घेतली होती. सुट्टीच्या काळात फयाझ एका लग्नात सहभागी होण्यासाठी शोपियामध्ये गेले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती.