प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात सामील झालेल्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संचलनात विविध राज्यांचे एकूण २५ चित्ररथ सहभागी झाले होते. या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरला. महाराष्ट्रानंतर झारखंडच्या चित्ररथाने दुसरा आणि कर्नाटकच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला. या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने चित्ररथाचे दिग्दर्शक शेखर मोरे यांनी आनंद व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया चित्ररथांचेही संचलन झाले. यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथातून वारकरी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले होते. राज्याच्या संस्कृतीचा भाग असलेल्या वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगणारा देखावा या चित्ररथावर साकारण्यात आला होता. विशेष म्हणजे, यासाठी सुप्रसिद्ध गायक-संगीतकार अजय-अतुल यांच्या बहुचर्चित माऊली…माऊली गाण्याचा वापर चित्ररथाचे पार्श्वसंगीत म्हणून करण्यात आला होता.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमध्ये फरक काय? तिरंगा फडकावण्याचा मान, नियम व जागा कशा बदलतात जाणून घ्या

मुख्यमंत्र्याकडून अभिनंदन

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या ‘पंढरीची वारी’ चित्ररथाने सर्वोत्तम चित्ररथाचा बहुमान पटकाविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले. या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना महाराष्ट्राचे लोकदैवत आणि लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविल्याबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. चित्ररथाची संकल्पना साकारणारे कारागीर तसेच त्यासोबत सहभागी झालेल्या कलावंतासह सांस्कृतिक विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.