अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडण्याच्या शर्यतीला नवे वळण मिळाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्राथमिक फेऱ्यांत घेतलेली आघाडी पाहता त्यांना रोखण्यासाठी त्यांच्याच पक्षातील टेड क्रुझ आणि जॉन कसिच हे नेते एकत्र आले आहेत. ट्रम्प यांनी मात्र या दोघांनी निराशेतून हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी पक्षांतर्गत १२३७ प्रतिनिधींची मते आवश्यक आहेत. ट्रम्प यांना तेवढी मते मिळू नयेत यासाठी टेक्सासचे सिनेटर क्रुझ आणि ओगायोचे गव्हर्नर कसिच यांनी जुलै महिन्यात होणाऱ्या क्लिव्हलँड येथील सभेपर्यंत आपसांत न लढण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडियाना राज्यात जिंकणाऱ्या नेत्याला सर्व प्रतिनिधींची मते एकगठ्ठा मिळणार आहेत. त्यामुळे त्या राज्यात ट्रम्प यांना जिंकू न देण्यासाठी क्रुझ आणि कसिच यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.