न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाचे संशोधन

सौरमालेबाहेरचा जास्त वसाहतयोग्य असलेला ग्रह खगोलवैज्ञानिकांनी शोधला असून तो आपल्या पृथ्वीपासून १४ प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहाभोवती फिरत आहे.

हा ग्रह वस्तुमानाने आपल्या पृथ्वीच्या चार पट असून लाल रंगाच्या वूल्फ १०६१ या ताऱ्याभोवती फिरत असलेले जे तीन ग्रह आहेत, त्यांच्यापैकी तो एक ग्रह आहेत.

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाचे डंकन राईट यांनी हा शोधनिबंध लिहिला असून त्यात म्हटल्यानुसार हा उत्साह वाढवणारा शोध असून कारण तीनही ग्रह खडकाळ असण्यास आवश्यक इतक्या वस्तुमानाचा असून त्याचा पृष्ठभाग खडकाळ आहे. मधला वूल्फ १०६ सी हा ग्रह ताऱ्यापासून ग्रहाचे अंतर वसाहतयोग्य टप्प्यात असलेल्या गोल्डी लॉक झोनमध्ये आहे व तेथे पाणी असण्याची शक्यता आहे. आपल्याजवळच्या ताऱ्याभोवती असा ग्रह सापडणे ही विलक्षण गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या जवळचा एक ग्रह वसाहतयोग्य असण्याचा आनंद मोठा आहे.

वूल्फ १०६१ पेक्षाही जवळ अंतरावरच्या काही ताऱ्यांभोवतीही ग्रह सापडले आहेत, तेही वसाहतयोग्य असू शकतात. आता सापडलेले तीन ग्रह थंड असून ताऱ्याभोवती त्यांची प्रदक्षिणा अनुक्रमे ५, २८ व ६७ दिवसांत पूर्ण होते. त्यांची वस्तुमाने ही पृथ्वीच्या १.४, ४.३ व ५.२ पट आहेत. बाहेरचा मोठा ग्रह हा वसाहतयोग्य गोल्डीलॉक झोनच्या बाहेर आहे व तोही खडकाळ असू शकतो तसेच आतल्या भागातील ग्रह ताऱ्याच्या जवळ असून तोही वसाहतयोग्य ठरू शकतो.

वूल्फ १०६१ बाबत हायअ‍ॅक्युरसी रॅडियल व्हेलॉसिटी प्लॅनेट सर्चर स्पेक्ट्रोस्कोप या युरोपीयन सदर्न ऑब्झर्वेटरी म्हणजे वेधशाळेच्या वर्णपंक्तीमापकाचा वापर केला आहे. ही ३.६ मीटरची दुर्बीण चिलीमध्ये आहे. वूल्फ १०६१ या ताऱ्याची दहा वर्षांची निरीक्षणे तपासली असल्याचे एक्स्प्लोरेटरी सायन्सचे ख्रिस टिनी यांनी सांगितले.

हे तीनही ग्रह आपल्या परसदारी असल्यासारखे असून ते वसाहतयोग्य ग्रहांच्या गटात मोडतात. आपल्या सूर्यापेक्षा कमी तप्त अशा ताऱ्यांभोवती ते फिरत आहेत. खडकाळ ग्रह आपल्या दीर्घिकेत बरेच आहेत. बहुग्रहीय प्रणालीही अनेक ठिकाणी दिसून येते. या ग्रहाविषयी वैज्ञानिकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील संशोधनाला चालना मिळेल, असे मत या वेळी खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केले.

तापमान अधिक

वैज्ञानिकांनी शेकडो ते हजारो प्रकाशवर्षे दूर अंतरावर असे अनेक खडकाळ ग्रह शोधले आहेत. ग्लीस ६६७ सी हा ग्रह २२ प्रकाशवर्षे दूर असून तो बटू ताऱ्याभोवतीची प्रदक्षिणा २८ दिवसांत पूर्ण करतो व तो वस्तुमानाने पृथ्वीच्या साडेचार पटींनी अधिक आहे. वूल्फ १०६१ या ताऱ्याभोवती हे ग्रह जवळ असल्याने ते ताऱ्यासमोरून जातात. जर ते जात असतील, तर त्यांच्या वातावरणाचाही अभ्यास करता येईल, असे रॉब विटेनमायर यांनी सांगितले. अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.