सडकी फळे, माती व कुजणारी पाने यांच्यावर नेहमी आढळणाऱ्या काळ्या बुरशीपासून जेट विमानाचे इंधन तयार करण्याचा मार्ग अमेरिकी वैज्ञानिकांनी शोधून काढला आहे. त्यामुळे विमानांसाठी किफायतशीर इंधन तयार करणे येत्या पाच वर्षांंत शक्य होणार आहे.
अतिशय आश्वासक असे हे संशोधन आहे, असे वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक बिरगिट एरिंग यांनी सांगितले. बुरशीवर आधारित इंधन हे आगामी काळात उपलब्ध होणार आहे यात शंका नाही व त्यात प्रचंड संधी आहेत. संशोधकांनी अ‍ॅस्पिरगिलस काबरेनॅरियस आयटीइएम ५०१० या बुरशीपासून हायड्रोकार्बनची निर्मिती केली आहे. हायड्रोकार्बन हा पेट्रोलियम इंधने व हवाई इंधनांचा प्रमुख घटक असतो.
ओटचे पीठ, गव्हाचे कूस व मक्याच्या पिकातील कचरा यावर ही बुरशी वाढते. एरिंग यांच्या गटाने यापूर्वी अ‍ॅस्पिरगिलस बुरशीपासून वितंचके तयार केली होती, त्याचबरोबर इतर उपउत्पादने तयार करण्यातही यश आले होते. त्यामुळे त्यांनी आता ए. काबरेनॅरियस आयटीइएम ५०१० या बुरशीपासून जैवइंधन तयार करण्याच्या दिशेने संशोधन सुरू केले. अमेरिकेच्या ऊर्जा खात्याच्या पॅसिफिक नॉर्थवेस्ट नॅशनल लॅबोरेटरीत त्यांनी ए. काबरेनॅरियस या बुरशीतही जनुकीय बदल घडवून आणले होते. संशोधनानुसार बुरशी जीवाणूंचा हल्ला झाल्यानंतर त्यांच्याशी मुकाबला करण्याच्या उद्देशाने हायड्रोकार्बनची निर्मिती करते. शैवाल व काही जीवाणूंमध्ये जनुकीय संकेतांकनाचा वापर करून अधिक हायड्रोकार्बन निर्मितीचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे. फंगल बायॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.