५० रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने नुकतीच केली होती. त्यानंतर आता लवकरच २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे. याबाबतची घोषणा ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बनावट नोटांचा ‘उद्योग’ थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी २०० रुपयांची नोट चलनात आणण्याची तयारी बँकेने सुरू केली आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. २०० रुपयांच्या सुमारे ५० कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार आहेत.

१०० ते ५०० रुपयांमध्ये कोणतीही नोट चलनात नाही. त्यामुळे २०० रुपयांची नोट फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे नोटांची उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे, असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. काळा पैसा आणि बनावट नोटांच्या कारभाराला चाप लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात २०० रुपयांची नोट बाजारात येणार असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे.

नव्या नोटा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्यांना थोड्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कर चुकवून मोठ्या प्रमाणात रोकड बाळगणाऱ्यांना चाप लावणे हा २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचा उद्देश आहे, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सौम्य कांती घोष यांनी सांगितले. विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर २००० रुपयांची नवी नोट चलनात आणण्यात आली. त्यावेळी अनेक ठिकाणी बनावट नोटा मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. २०० रुपयांची नवी नोट चलनात आणल्यास रोखीचे व्यवहार सुलभ होतील. तसेच एकूण चलनातील कमी मूल्याच्या नोटांची संख्या वाढेल, असेही घोष यांनी सांगितले.