केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी परदेशी महिला पर्यटकांना भारतात शॉर्ट स्कर्ट घालून फिरु नका असा सल्ला दिल्याने देशभरात वाद निर्माण झाला आहे. पण ब्रिटनमधील परराष्ट्र मंत्रालयाने मात्र ब्रिटनच्या महिलांनी भारतातील ड्रेसकोडचा आदर करावा असे म्हटले आहे.
ब्रिटनमधील परराष्ट्र खात्याने भारतात येणा-या महिला पर्यटकांसाठी सुचनांची यादीच तयार केली आहे. ‘भारतात महिला पर्यटकांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भारतात जाणा-या महिला पर्यटकांनी सतर्क राहावे’ असे या सुचना पत्रात म्हटले आहे.  ब्रिटीश महिलांवर गोवा, दिल्ली, बेंगळुरु, राजस्थान अशा विविध भागात अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. महिलांना एखाद्या व्यक्तीकडून किंवा गटाकडून छेडछाडीचाही सामना करावा लागतो असे यात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या महिलांनी भारतात जाताना स्थानिक ड्रेसकोडचे पालन करावे आणि  निर्जनस्थळी एकट्याने जाणे टाळावे असे या सुचना पत्रात म्हटले आहे.  भारतातल्या स्थानिक पद्धतीनुसार तुमची वेशभूषा असावी. स्थानिक महिला कसे कपडे घालतात याकडे लक्ष द्या असेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय बाघा बॉर्डरवगळता भारत – पाकिस्तान सीमा रेषेजवळ जाणे टाळावे. या सर्व भागांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे असे ब्रिटनने म्हटले आहे.
ब्रिटनमधील परराष्ट्र मंत्रालयानुसार दरवर्षी सुमारे आठ लाख ब्रिटीश नागरिक भारतात पर्यटनासाठी येतात. यातले बहुसंख्य लोकांची भ्रमंती निर्विघ्न होते. मात्र विशेषतः गोवामध्ये ब्रिटीश पर्यटकांना त्रास झाल्याचे अधिकारी सांगतात. आग्रा, जयपूर आणि गोव्यामध्ये भामट्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. परदेशात दागिने घरपोच देऊ असे सांगत काही जण तुमच्याकडून पैसे घेतील. पण त्यांच्या जाळ्यात अडकू नका असा सतर्कतेचा इशाराही महिला पर्यटकांना देण्यात आलाआहे.