देशाची राजधानीत उन्हाची झळ लागत असताना दिल्लीकर गौरव गुप्ता एका वातानुकूलीत ‘रेस्टॉरन्ट’मध्ये दुपारच्या जेवाणासाठी आले. अगदी नवेच ‘रेस्टॉरन्ट’ होते. आत प्रवेश करताच ‘रेस्टॉरन्ट’ कर्मचाऱयाने स्मित हास्याने गुप्तांचे स्वागत केले आणि जेवणाची ऑर्डर दिली. प्रत्येक ‘रेन्टॉरन्ट’मध्ये ग्राहकाचे कर्मचाऱयाकडून आदरातिथ्य होणे सहाजिकच आहे परंतु, या नव्या ‘तिहार फूड कोर्ट’ रेस्टॉरन्टचे कर्मचारी आहेत दिल्लीतील तिहार तुरूंगातील कैदी.
होय, तिहार तुरूंगातील कैद्यांचे ‘तिहार फू़ड कोर्ट’ नावाचे रेस्टॉरन्ट तुरूंगापासून अर्ध्या किमी. अंतरावर सुरू करण्यात आले आहे. तुरूंगातील कैद्यांच्या पुर्नवसनाच्या प्रयत्नातून तिहार तुरुंगाच्या अधिपत्याखाली प्राथमिक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या तिहार फुड कोर्टचे उदघाटन करण्यात आले. विशेषबाब म्हणजे, या ‘रेस्टॉरन्ट’ला दिल्लीकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहक पहिल्यांदा कुतूहलापोटी इथे भेट देताना दिसतात पण, ‘रेस्टॉरन्ट’मधल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर समाधानाच्या आणि कौतुकाच्या प्रतिक्रियाही ‘तिहार फूड कोर्ट’ला मिळत आहेत.
या छोटेखानी ‘रेस्टॉरन्ट’ची व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे. इतकेच काय, तर रेस्टॉरन्टमधील भिंतींवर टांगण्यात आलेली शोभाचित्रेही कैद्यांनीच रेखाटली आहेत. रेस्टॉरन्टमध्ये एकावेळी ५० जणांच्या बसण्याची व्यवस्था असून रेस्टॉरन्टमध्ये काम करणाऱया कैद्यांना सुरूवातीला हॉटेल व्यवस्थापन विद्यालयामार्फत प्रशिक्षणही देण्यात आले आहे.