राक्षसी बहुमताच्या जोरावर सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षावर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. वर्चस्वाची ही लढाई विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून सुरू झाली. प्रशांत भूषण व प्रा. योगेंद्र यादव यांच्या समर्थकांना उमेदवारी न देता केजरीवाल यांनी पहिल्यांदा या नेत्यांना कोंडीत पकडले. आता तर सरकार स्थापन झाल्यानंतरही केजरीवाल यांना पक्षावर स्वत:चे नियंत्रण हवे आहे. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना पक्षात पद मिळणार नाही, असे पक्षाच्या घटनेत नमूद आहे. मात्र एकाच व्यक्तीने लाभाची दोन पदे स्वीकारण्यास विरोध नाही. हेच खरे प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांचे दुखणे आहे. कारण त्यामुळे केजरीवाल यांच्याच हातात पक्षाची सूत्रे एकवटली गेली आहेत.
‘आप’मधील अंतर्गत संघर्षांचे पडसाद सरकारच्या कारभारात उमटत आहे. आमदारांमध्ये अस्वस्थता तर मंत्र्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राष्ट्रीय परिषदेतून सचिवालयात जाण्याऐवजी केजरीवाल थेट घरी पोहोचले व तेथूनच त्यांनी कामकाज केले. यामुळे मंत्र्यांमध्ये अत्यंत विपरीत संदेश गेला. प्रसारमाध्यमांसमोर प्रशांत भूषण व योगेंद्र यादव केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर वार करण्याची एकही संधी सोडत नाही, तर पक्षाकडे केजरीवाल वगळता अन्य एकही आश्वासक चेहरा नाही. त्यामुळे संजय सिंह, आशीष खेतान व आशुतोष यांचे प्रत्युत्तर जनतेते गांभीर्याने घेतले जात नसल्याचा ‘फिडबॅक’ केजरीवाल यांना त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
या सर्व भांडणात ‘कळीचा नारद’ अशा शब्दात कुमार विश्वास यांच्यावर यागेंद्र यादव व प्रशांत भूषण यांचे समर्थक नेते कार्यकर्ते तोंडसुख घेतात. केजरीवाल विरोधी गटानुसार कुमार विश्वास हेच अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रभाव टाकतात. त्यांनीच यादव व प्रशांत भूषण यांच्याविरोधात केजरीवाल यांचे कान भरल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाची राष्ट्रीय परिषद जमीन अधिग्रहण विधेयकावर सरकारची अधिकृत भूमिका ठरवण्यासाठी होती. मात्र ही चर्चा केवळ प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांच्याभोवतीच केंद्रित राहिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाने जमीन अधिग्रहण विधेयकावरून केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपोआपच चर्चेत राहू, अशी रणनीती आखण्यात आली आहे. सरकारमध्ये समन्वयासाठी केजरीवाल प्रत्येक आमदाराशी संवाद साधणार असल्याचा दावा  सूत्रांनी केला.