मलेशियाच्या तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एमएच ३७० या विमानाचा शोध घेण्यात जगातील अव्वल समजली जाणारी ऑस्ट्रेलिया, चीन, आणि मलेशियाची हवाई उड्डाण मंत्रालये सपशेल अपयशी ठरली आहेत. त्यांनी वर्षांची शोध मोहीम थांबवली आहे. त्यामुळे आता मलेशियाच्या सरकारने या विमानाचे अवशेष शोधणाऱ्या कंपनीला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

बेपत्ता विमानाचे अवशेष शोधण्यात यशस्वी ठरणाऱ्या खासगी कंपनीला सरकारतर्फे बक्षीस देण्यात येईल, असे मलेशियाचे वाहतूक मंत्री अब्दुल अझिझ काप्रावी यांनी आज गुरुवारी जाहीर केले आहे. बक्षीसाचे स्वरुप अद्याप ठरवण्यात आलेले नाही. विमानाचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांनी सरकारशी संपर्क साधावा. त्यानंतर त्यांनीच बक्षिसाचे स्वरुप ठरवावे, असेही वाहतूक मंत्र्यांनी सांगितले.

मार्च २०१४ मध्ये मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून २३९ प्रवाशांना घेऊन बीजिंगकडे उड्डाण केलेले एमएच ३७० हे विमान बेपत्ता झाले होते. एमएच ३७० या विमानाच्या अवशेषांचे शोध घेण्याचे कार्य थांबविण्यात आल्याची घोषणा नुकतीच मलेशियाच्या सरकारने केली होती. जवळपास तीन वर्षे ही शोधमोहीम सुरू होती. या विमानाचे २० पैकी केवळ ७ भागच मिळाले. हा शोध थांबविण्याचा निर्णय मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या सरकारने संयुक्तरित्या घेतला आहे.

क्वालालंपूर येथून उड्डाण केलेले एमएमच ३७० हे विमान बीजिंगला निघाले होते. थोड्याच वेळात या विमानाचा संपर्क तुटला आणि हे विमान रडारवरही दिसेनासे झाले. या विमानात एकूण २३९ जण होते. या मोहिमेसाठी १८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा खर्च झाला. शोधकर्त्यांनी विमान आणि जहाजांच्या साहाय्याने व्यापक शोध घेऊनही या विमानाचा काहीही मागमूस लागलेला नाही. इतका शोध घेऊनही शेवटी हाती काहीच लागत नसल्याचे पाहून या तिन्ही देशांनी हा शोध थांबवला आहे. त्यांनी याबाबत विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांना कळवले असल्याचे म्हटले आहे.