गेल्या काही दिवसांच्या तुलनेत महाराष्ट्रात अचानकपणे तापमान वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यातील भीरामध्ये २४ तासांमध्येच तापमान वाढले असून या ठिकाणी पारा ४६.५ अंशांच्या वर गेला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात तब्बल अंशांने तापमान वाढले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या उष्ण आणि शीत लाटांमुळे तापमान वाढले असल्याचे हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुढील दोन तीन दिवस असेच तापमान राहील असा अंदाज आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानंतर आद्रता असलेले वारे येण्यास सुरुवात होणार असून हे तापमान कमी होण्याची शक्यता आले असे ते म्हणाले. इंदोर आणि जयपूरमध्ये तर गेल्या १०-११ वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जयपूरमध्येही पारा ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. होशंगाबाद आणि खरगोनमध्ये पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. सध्या मध्य भारत आणि महाराष्ट्रात उष्ण वारे वाहत असल्याचे पुण्याचे हवामान खात्यातील शास्त्रज्ञ पीसीएस राऊफ यांनी इकोनॉमिक टाइम्सला सांगितले आहे. गेल्या सात वर्षात शिमल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. शिमल्यामध्ये २५.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानच्या बारमेरमध्ये ४४ अंशांच्या वर तापमान गेले आहे.

अकोला, जळगाव, पुणे, मुंबई, मालेगाव, नाशिक, सांगली, नागपूर आणि सोलापूर या ठिकाणी ४० च्या वर पारा गेला आहे. या अचानकपणे झालेल्या वाढीमुळे शास्त्रज्ञही चकित झाले आहेत. मागील वर्षी याच महिन्यात ३५ ते ३६ अंश तापमान होते परंतु या वर्षी ४२ ते ४४ तापमान झाले आहे. या वर्षी सरासरीपेक्षा अधिक उन्हाळा अनुभवास येणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे जास्त काळजी घ्यावी असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मागील वर्षी देशभरात उष्माघाताने अनेक लोक बळी गेले होते या वर्षी उष्माघाताने लोकांचे बळी जाऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी असे स्कायमेटने सांगितले आहे. केवळ तेलंगणा राज्यातच हजारपेक्षा अधिक बळी गेले होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने तसेच प्रशासनाने उन्हापासून आपले संरक्षण करावे असे त्यांनी म्हटले आहे.