रामदेव बाबा यांच्या पतंजलीचा सद्या बाजारपेठेत चांगलाच बोलबाला पाहायला मिळतो आहे. अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकत पतंजलीने अल्पावधीतच बाजारपेठा आणि घराघरांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळेच आता दिग्गज कंपन्यांनी पतंजलीला टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. गृहपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर यांच्यासह अनेक दिग्गज कंपन्यांनी पतंजलीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नवी योजना तयार केली आहे. यासाठी नैसर्गिक उत्पादनांवर भर देण्याचा या कंपन्यांचा मानस आहे. गृहपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रात पतंजलीकडे सध्या मोठी आघाडी आहे.

पतंजलीने यंदाच्या आर्थिक वर्षात २१ हजार कोटींची कमाई केली आहे. मागील वर्षातील कमाईचा विचार केल्यास पतंजलीच्या महसुली उत्पन्नात यंदा दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे गृहपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्यांचा महसूल घटला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हातातून निसटलेली बाजारपेठ पुन्हा काबीज करण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, नेस्ले, मॅरिको, गोदरेज या कंपन्यांनी विशेष योजना आखली आहे. यासाठी नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. आतापर्यंत या क्षेत्रात पतंजलीने मोठी आघाडी घेतली आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हरकडून नैसर्गिक उत्पादनांची निर्मिती जास्तीत जास्त प्रमाणात वाढवली जाणार आहे. मधाच्या उद्योगातील पतंजलीचे साम्राज्य खालसा करण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हरने पद्धतशीरपणे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हरने राष्ट्रीय स्तरावर ‘आयुष’ ब्रँड लॉन्च केला आहे. आयुषने दक्षिण भारतात चांगली कामगिरी केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरकडून अनेक आयुर्वेदिक ब्रँड्स लॉन्च करण्यात आले आहेत. यासोबतच कोलगेटनेसुद्धा नैसर्गिक उत्पादनांवर भर देण्याची योजना आखली आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय सचिव संजीव मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये ‘आयुष’ ब्रँड अंतर्गत येणारी उत्पादने बाजारात दिसू लागतील. दक्षिण भारतात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता देशभरात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’ यासोबतच स्किनकेअर उत्पादनांसाठी हिंदुस्तान युनिलिव्हरकडून सिट्रा ब्रँड लॉन्च करण्यात येणार आहे. या अंतर्गत १२ उत्पादने लॉन्च केली जाणार आहेत.