राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. भाजप आणि संघाच्या नेत्यांनो मी तुम्हाला दिल्लीतील खुर्चीवरून खाली खेचेन, यासाठी भले मला माझी स्थिती काहीही होवो. याद राखा, मला घाबरवण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ माझा बदला घेत आहेत. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी सरळसरळ धमकीच त्यांनी दिली. ते माझ्या पक्षाची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, मोदी सरकारचे जर हेच धोरण राहिले तर ५ वर्षेही हे सरकार टिकणार नाही. येत्या २७ ऑगस्ट रोजी पाटणा येथील गांधी मैदानावर एका विशाल मोर्चाचे आयोजन केले जाणार असून यात समान विचारणसरणीचे सर्व नेते उपस्थितीत असतील आणि ते आपली पुढील रणनिती निश्चित करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

या मोर्चासंबंधी लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी (दि. १७ मे) सकाळी सोनिया गांधी यांना फोनवरून या मोर्चात सहभागी होण्याची विनंती केली होती. जर आपण भाजपविरोधात एकत्र आलो नाही तर आपण संपुष्टात येऊ, असे लालूंनी सोनियांना म्हटल्याचे ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तात म्हटले आहे. दहा मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. एका सूत्राकडून मिळालेलया माहितीनुसार लालूप्रसाद यादव यांच्या हवाल्याने म्हटले की, मॅडम तुम्ही २७ तारखेला अवश्य या. भाजपला पराभूत करता येऊ शकेल, यासाठी मी समान विचारधारा असलेल्या पक्षांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जरूर आले पाहिजे. जर तुम्ही एखाद्या कारणामुळे येऊ शकला नाहीत तर प्रियंका गांधीना पाठवून द्या. लालूंनी अप्रत्यक्षरित्या राहुल गांधींना या मोर्चा सहभागी न होण्याचा संदेश दिल्याचे बोलले जाते.

दरम्यान, दि. १६ मे रोजी प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेनामी संपत्तीप्रकरणी दिल्ली आणि गुरूग्राम येथील २२ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. गेल्या ४० दिवसांपासून भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे लालूप्रसाद यादव कुटुंबीयांवर बेनामी संपत्तीबाबत नवनवे खुलासे करत आहेत. त्यानंतर त्यांनी भाजप आणि भाजप समर्थित मीडियावर निशाणा साधला होता.

भाजपमध्ये लालूचा आवाज दाबण्याची हिंमत नाही. मी धमक्यांना घाबरणारा नाही. जोपर्यंत शेवटचा श्वास असेल तोपर्यंत अशा शक्तींविरोधात लढेल. या वेळी त्यांनी भाजपचा ‘नवा पार्टनर’ असा उल्लेख केला होता. पण तो कोणाला उद्देशून केला हे सांगणे त्यांनी टाळले. त्यामुळे वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.