पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात न उतरविता धर्मनिरपेक्ष शक्तींना पाठिंबा देण्यासाठी काम करण्याचा निर्णय राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी येथे जाहीर केला.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत राजद एकही उमेदवार रिंगणात उतरविणार नाही, भाजप आणि संघ परिवार यांसारख्या शक्तींच्या नेतृत्वाखालील जातीयवादी शक्तींचा पराभव करणे हे आपल्या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, धर्मनिरपेक्ष शक्तींना पाठिंबा देण्यासाठी राजद काम करणार आहे, असे लालुप्रसाद यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. उत्तर प्रदेशात सत्तारूढ सपाला सहकार्य करणार का, असे विचारले असता लालूप्रसाद म्हणाले की, सपाचे नेते मुलायमसिंह हे आपले व्याही आहेत आणि आपण त्यांची विशेष काळजी घेऊ. राजदने निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी बिहारमधील महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या जद(यू)ने मात्र उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित केले आहे.