क्षमतेहून अधिक प्रवाशांनी भरलेली बस आणि वेगाने येणारा ट्रक यांची सिंध प्रांताच्या दक्षिण भागांत मंगळवारी जोरदार टक्कर होऊन बसने पेट घेतल्याने झालेल्या अपघातात २१ महिला आणि १९ मुलांसह ५८ जण ठार झाले आहेत.
सदर बस खैबर पख्तुनवा येथून कराचीकडे जात असताना सुक्कूर जिल्ह्य़ातील टेहरीजवळ ट्रकवर आदळली. हा अपघात होताच बसच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्याने बसने पेट घेतला. त्यामध्ये किमान ५८ जण ठार झाले, असे पोलीस अधिकारी अफझल सोमोरो यांनी सांगितले.
या अपघाताची खबर मिळताच मदतकार्य पथकाने मृतदेह नजीकच्या सुक्कूर आणि खैरपूर येथील हॉस्पिटलमध्ये हलविले. या अपघातात जखमी झालेल्या १५ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
बसचालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे. या बसमध्ये क्षमतेहून अधिक म्हणजे ७० प्रवासी होते. मात्र या अपघाताबाबत विविध प्रकारची मते व्यक्त केली जात आहेत. बसचालकाने अन्य वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि बस समोरून वेगाने येत असलेल्या ट्रकवर आदळली, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.तर गाडीत इंधन भरून मुख्य रस्त्यावर बस येत असतानाच वेगाने येणारा ट्रक त्यावर आदळला, असे वाहतूक पोलिसाने सांगितले.