भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाड्यांवरील नियंत्रण सुटले की काय होते, हे वेगवेगळ्या अपघातांमधून बघायला मिळतेच. असाच एक अपघात सोमवारी दिल्लीतील जनकपूरी भागामध्ये घडला. रस्त्याच्या कडेने चालत निघालेल्या नागरिकांना भरधाव मोटारीने उडवल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही चित्रीकरण बघितल्यास अंगावर काटा येतो. अगदी क्षणार्धात घडलेल्या घटनेनंतर ठोकर दिलेल्या कारमुळे रस्त्यावरील एक नागरिक काही मीटर मागे फेकला गेला.

दिल्लीतील जनकपुरी परिसरात घडलेल्या घटनेत मद्याच्या प्रभावाखाली असलेल्या एका तरुणाने भरधाव गाडी चालवत तीन लोकांना टक्कर मारली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. चालकाचे नाव ऋषभ रावल असून, २१ वर्षीय ऋषभ इंद्रप्रस्थ विश्वविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत आहे. ऋषभने भरधाव गाडी चालवत केवळ पाच मिनिटांत तीन जणांना टक्कर मारली. १५ मिनिटे पाठलाग केल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. शिवसागर येथून आरोपी आपल्या होंडा सिटी गाडीतून येत होता. त्याने रात्रभर दारू प्यायली होती. सकाळी सहा वाजण्याच्या आसपास ममतानी मार्गावर कमलेश्‍वर प्रसाद नावाच्या व्यक्तीला त्याने आपल्या भरधाव गाडीने उडविले. त्यानंतरदेखील तो गाडी चालवतच राहिला. पुढे त्याने संतोष नावाच्या व्यक्तीला गाडीने उडविले. यानंतर तो सुरजमल कॉलेजच्या दिशेने गेला. या ठिकाणी त्याने अश्विनी आनंद नावाच्या व्यक्तीस भरधाव गाडी चालवत टक्कर मारली. अखेरीस पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या शरीरात १५९ एमजी इतके दारूचे प्रमाण आढळून आले. मद्याच्या प्रभावाखाली असलेल्या ऋषभला काय घडले ते ठाऊक नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

संतोषला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. तर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या कमलेश्वर प्रसाद आणि अश्विनी आनंद यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वडिलांकडून भेट म्हणून मिळालेल्या या गाडीची नोंदणी ऋषभच्या नावावर आहे. जेव्हा पोलिसांनी पाठलाग करून ऋषभला अडवले तेव्हा गाडीच्या बाहेर येत त्याने पोलिसांकडे सिगारेट पेटवण्यासाठी लायटरची मागणी केली. त्याचप्रमाणे आपले वडील नुकसान भरपाई देतील, असे मुजोरपणे सांगितल्याचे पोलिसांकडून समजते.

ऋषभच्या वडिलांचे जनकपुरी परिसरात हार्डवेअरचे दुकान आहे. जे काही झाले ते अविश्वसनीय असल्याचे सांगत अश्विनी आनंद यांचे जावई म्हणाले की, माझे सासरे त्यांच्या बायकोसोबत येथे राहात होते. सीसीटिव्हीतील दृष्ये पाहून मी खूप व्यथित झालो आहे. ही दूर्घटना नसून, हत्या असल्याचे ते म्हणाले. आनंद यांच्या दोन मुली असून देघीही अमेरिकेत राहातात. तर मुळचे बिहारमधील सिवान जिल्ह्यातील मगहर गावातील रहिवासी असलेले कमलेश्वर प्रसाद सूचना आणि प्रसारण मंत्रालयात कार्यरत होते. एक वर्षापूर्वी त्यांचे प्रमोशन झाले होते. या अपघातात जबर जखमी झालेला संतोष कार वॉशरचे काम करत असून तो मुळचा बिहारचा रहिवासी आहे.

पाहा ‘एएनआय’ने ट्विटरवर शेअर केलेले चित्रीकरण

accident-1