काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल सातत्याने माझ्याबाबती बिनबुडाचे आरोप करत आहेत. मी त्यांना नम्रपणे सांगतो की त्यांनी थेट माझ्याशी बोलावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये वडेरा म्हणतात, मला वाटतं अरविंद केजरीवाल यांच्या डिक्शनरीत ‘रॉबर्ट वडेरा’ हे त्यांचे आवडते नाव असावं. त्यांना वाटतं वडेरा त्यांना जिवंत खाऊन टाकेन. यावरून माझ्या प्रती ते काय विचार करतात हेही दिसून येते. ते सातत्याने माझ्याबाबतीत बिनबुडाचे वक्तव्य करत आहेत. मी त्यांना नम्रपणे निवेदन करतो की, त्यांनी थेट माझ्याशी बोलावे. माझ्याविरोधात त्यांच्या मनात काही असेल ते सर्व त्यांनी मला सांगावे. काही तरी सांगून लोकांना भडकवण्याचे त्यांनी काम करू नये. तरीही मी त्यांच्या या प्रयत्नांना शुभेच्छा देतो, असे त्यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी वडेरा यांच्यावर टीका केली होती. त्यावर वडेरा यांनी आज सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पंतप्रधान सत्येंद्र जैन यांना अटक करू शकतात पण शीला दीक्षित यांना नाही. जर पंतप्रधानांनी रॉबर्ट वडेरा यांच्याविरोधात पाऊल उचलले तर मी समजेन की त्यांच्याकडे ५६ इंचाची छाती आहे, असा टोला केजरीवाल यांनी लगावला होता. वडेरा हे मला जिवंत खातील, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली होती.
दिल्लीच्या जनतेने मला निवडून दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या लोकांचा बदला घेत आहे. ते दिल्ली सरकारच्या कामात बाधा निर्माण करत असल्याचा आरोप, केजरीवाल यांनी केला होता.