हरयाणातील भूखंडांच्या व्यवहारांवरून आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या ‘आर्थिक भरभराटी’चे आणखी पुरावे आता समोर येत आहेत. वढेरा यांच्या मालकीच्या तीन कंपन्यांनी राजस्थानमधील जमीन व्यवहारांतून अवघ्या तीन वर्षांत ६०० टक्के नफा कमवल्याचे उघड झाले आहे. २००९ ते २०१२ या वर्षांत वढेरा यांच्या कंपन्यांनी राजस्थानातील शेकडो एकर जमिनी अत्यंत माफक दरात खरेदी करून नंतर त्या तीन ते सात पट अधिक रकमेने विकल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार लक्षात आल्याने राजस्थानमधील भाजप सरकारने आता या कंपन्यांच्या ताब्यातील उर्वरीत जमीन आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
एकाकडून जमीन खरेदी करायची, काही काळ ती आपल्याकडे ठेवायची. जमिनीचे भाव वाढले की ती दुसऱ्याला विकून टाकायची. मधल्या मध्ये नफा कमवायचा, हा प्रकार सध्या सर्वच ठिकाणी सुरू आहे. मात्र, वढेरा यांच्या मालकीच्या कंपन्यांनी या व्यवहारातून कोटय़वधींचा नफा कमवला. विशेष म्हणजे, वढेरा यांच्या कंपन्यांकडून जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये राजस्थानच्या माजी अर्थमंत्र्यांच्या पुतण्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. वढेरा यांच्या मालकीच्या स्काय लाइट रिअल्टी, स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी आणि ब्ल्यू ब्रीझ ट्रेडिंग या  कंपन्यांतील व्यवहारांचा तपशील पाहता कोणाचेही डोळे पांढरे होतील.
*स्काय लाइट रिअल्टी : २०१० मध्ये स्काय लाइटने ६०.५३ हेक्टर जमीन ४६ लाख नऊ हजार ९६० रुपयांना विकत घेतली. मार्च ते मे २०१२ या कालावधीत हीच जमीन दोन कोटी ९६ लाख १२ हजार २३७ रुपयांना विकली. खरेदी व्यवहाराच्या सहा पटीने जमिनीची विक्री झाली. मार्च, २०१० मध्ये स्काय लाइटने २९.३६ हेक्टर जमीन २८ लाखांना विकत घेतली आणि मुंबईस्थित फॉनरोशे साराज एनर्जी प्रा. लि. या कंपनीला मे, २०१२ मध्ये एक कोटी ९९ लाख ५६ हजारांना विकली.
*स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी : जानेवारी, २०१० मध्ये स्काय लाइट

हॉस्पिटॅलिटी कंपनीने ६९.५५ हेक्टर जमीन अवघ्या ७२ लाखांना विकत घेतली. हीच जमीन जानेवारी, २०१२ मध्ये कंपनीने अ‍ॅलिजेनी फिनलीज या दिल्लीस्थित कंपनीला दोन व्यवहारांत विकली. हेक्टरी एक लाखांहूनही कमी रकमेला पदरात पाडून घेतलेली ही जमीन विकताना मात्र कंपनीने हेक्टरी सात लाख ४१ रुपये या दराने विकली. या व्यवहारात कंपनीला पाच कोटी १५ लाख रुपये मिळाले.
*ब्ल्यू ब्रीझ ट्रेडिंग : जून, २००९ मध्ये या कंपनीने कोलायत तहसीलमध्ये ५० हेक्टर जमीन ४० लाख रुपये मोजून घेतली. एप्रिल, २०१० मध्ये आणखी १७.४० हेक्टर जमीन सात लाख ७० हजारांना विकत घेतली. मात्र, सन २०१२ मध्ये याच जमिनी दोन कोटी ७९ लाख रुपयांना विकून तब्बल ६०० टक्के नफा कमावण्यात आला आणि तोही,  अवघ्या तीन वर्षांत.

जमिनींचे सर्व व्यवहार कायद्यानुसारच करण्यात आलेले आहेत. त्यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. रॉबर्ट वढेरा यांनी  कायद्याचा मान राखला आहे.
 – सुमन खेतान अँड कंपनी
(वढेरा यांचे कायदा सल्लागार)