यांत्रिक बाहू असलेली रोबोटिक सबमरिन मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी हिंदी महासागरात सोडण्यात आली, पण ब्लॅक बॉक्स शोधण्याचा पहिलाच प्रयत्न मंगळवारी अयशस्वी ठरला. सुमारे साडेचार किलोमीटर खोलीवर या पाणबुडीच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र विमानाचे कसलेही अवशेष दिसले नाही.
दरम्यान, स्वयंचलित ‘ब्लूफिन २१’ हे पाण्याखालून जाणारे अमेरिकी नौदलाचे वाहन सोमवारी सायंकाळी ऑस्ट्रेलियाच्या ओशन फील्ड या जहाजातून सोडण्यात आले. त्याच्या बाजूच्या भागात सोनार यंत्र लावलेले आहे. मात्र या वाहनाने सोळा तासांच्या प्रयत्नांनंतरही निराशाच हाती आली. पहिला शोध हा त्या पाणबुडीच्या क्षमतेपेक्षा जास्त खोलीवर घेतला गेला. सहा तासांत ब्लूफिन-२१ने त्याची ४५०० मीटरची क्षमता ओलांडली. मात्र त्यातील एका सुरक्षा वैशिष्टय़ामुळे ते परत पृष्ठभागावर आणल्याचे संयुक्त समन्वय केंद्राने सांगितले. मंगळवारी विमानाच्या शोधाचा ३९ वा दिवस होता. सहा तासांच्या माहितीत या स्वयंचलित वाहनाने काही माहिती मिळवली असून त्याचे विश्लेषण चालू आहे.
चीनवर तंत्रज्ञांचा आरोप
चीनने काही दिवसांपूर्वीच मलेशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचे पिंग संदेश मिळाल्याचा जो दावा केला होता.पण आता ते पिंग संदेश विमानाचे नव्हते असे स्पष्ट झाले आहे. चीनने जर त्यांना मिळालेल्या पिंग संदेशाची शहानिशा केली असती तर नसता घोळ झाला नसता. चीनच्या दाव्यामुळे विमानाच्या शोधाची सर्व दिशाच बदलून गेली होती. नंतर अमेरिकेचे अधिकारी ज्या जहाजावर होते त्या ऑस्ट्रेलियन जहाजाला पिंग संदेश मिळाले व पुन्हा दिशा बदलण्यात आली. अमेरिकेने याप्रकरणी चीनला जबाबदार ठरविले आहे.
हिंदी महासागरातील मोठा परिसर पिंजून काढायचा असल्यामुळे  बेपत्ता विमानाचा शोध घेण्यास आणखी दोन महिने इतका कालावधी लागण्याची शक्यता अमेरिकेच्या नौदलाने व्यक्त केली आहे. अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने बेपत्ता विमानाचा शोध घेण्याचे काम  सुरू आहे. मात्र त्याला म्हणावे तसे यश येत नाही. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी मोठय़ा भागाची पाहणी करावी लागेल.