येत्या पंधरा वर्षांत यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालीमुळे इंग्लंडमधील एक कोटी नोकऱ्यांना संभाव्य धोका निर्माण झाला असल्याची माहिती एका अहवालाने शुक्रवारी दिली.

पीडब्लूसी या लेखापरीक्षण करणाऱ्या संस्थेने केलेल्या अभ्यासात स्वयंचलन तंत्रज्ञानामुळे येत्या १५ वर्षांत अमेरिकेत ३८ टक्के, जर्मनीत ३५ टक्के नोकऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर जपानमध्ये हे प्रमाण २१ टक्के इतके असणार आहे.

स्वयंचलित तंत्रज्ञानाचा प्रत्येक उदय़ोग क्षेत्रांवर भिन्न प्रभाव पडणार असल्याचे या विश्लेषणात आढळून आले आहे. वाहतूक आणि साठवणूक क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि घाऊक आणि किरकोळ व्यापार क्षेत्राला रोजगार कमी होण्याचा सर्वाधिक धोका आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालीमुळे उत्पादकतेला चालना मिळणार असून इतर रोजगार निर्माण करण्यास मदत होणार असल्याचेही अहवालात सांगितले आहे.

पीडब्लूसीनुसार घाऊक आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील २२ लाख नोकऱ्यांना संभाव्य धोका असून या क्षेत्रात इंग्लंडमधील सर्वाधिक नागरिक कार्यरत आहेत. उत्पादन क्षेत्रात १२ लाख नोकऱ्या आणि वाहतूक साठवणूक क्षेत्रामध्ये प्रशासकीय सेवेतील साडेनऊ लाख नोकऱ्यावर गदा येण्याची शक्यता आहे.  शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्राला स्वयंचलित तंत्रज्ञानाचा सर्वात कमी धोका आहे. या अहवालानुसार ३५ टक्के अल्पशिक्षित पुरुष तर, २६ टक्के महिलांचा रोजगाराला धोका निर्माण होणार आहे.