रोहिंग्या मुस्लिम ही म्यानमारची समस्या आहे आणि त्यावरचे उत्तर म्यानमारनेच शोधले पाहिजे, बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी सुनावले आहे. बांगलादेशात थांबणे हा रोहिंग्यापुढचा पर्याय असू शकत नाही. रोहिंग्या मुस्लिमांनी लवकरात लवकर आपला देश गाठावा, असेही त्यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

म्यानमारमध्ये हिंसाचार उसळला त्यानंतर रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात येण्याचा पर्याय निवडला आणि इथे आश्रय घेतला. मात्र, आता म्यानमारने या सगळ्यांना परत बोलावले पाहिजे. यासाठी आम्ही म्यानमारला एक लेखी प्रस्तावही दिला आहे. सुरूवातीला म्यानमारने रोहिंग्यांना परत बोलवण्यात पुढाकार घेतला. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. रोहिंग्यांना म्यानमानरने वाऱ्यावर सोडू नये, असेही हक यांनी स्पष्ट केले.

म्यानमारच्या रखाइनमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर पाच लाखांपेक्षा जास्त रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशात आले. या सगळ्यांना म्यानमारने परत बोलावलेच पाहिजे. रोहिंग्या आश्रितांमध्ये बहुतांश लोक मुस्लिम आहेत. मात्र. काही लोक हिंदू आणि ख्रिश्चनही आहेत. या सगळ्यांची जबाबदारी आम्ही कशी काय घेणार? म्यानमारचे परराष्ट्र मंत्री ए. एच महमूद अली यांनी रोहिंग्या शरणार्थींना परत बोलवण्याच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली होती. मग आता त्यांना आश्वासनाचा विसर पडला का? असा सवाल हक यांनी विचारला.

रोहिंग्याच्या प्रश्नाबाबत आंग सान सू की यांनी मौन का बाळगले आहे? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. लोकशाहीसाठी संघर्ष केल्याबद्दल १९९७ मध्ये सू की यांना एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी त्या पात्र होत्या असे त्यांच्या वागण्यावरून वाटत नाही, अशी टीकाही हक यांनी केली आहे.