‘ऑनलाइन एज्यूकेशन स्टार्ट अप’ चे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी आता ऑनलाइन स्कॉलरशिप निधीची स्थापना केली आहे. आशिया खंडात अशा स्वरुपाचा निधी सुरु केल्याची ही पहिलीच वेळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सुरुवातीला १०० कोटी आणि भविष्यात ३०० ते ४०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा स्क्रूवाला यांचा मानस आहे. यासाठी समविचारी मंडळी आणि कंपन्यांची मदत घेऊ असे स्क्रूवाला यांनी म्हटले आहे.

भारतात उच्चशिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात गरज असून त्या तुलनेत देशात उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण नगण्य आहे. कमी वयात नोकरीला लागल्याने अनेकांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहते. पण अशा विद्यार्थ्यांना आता रॉनी स्क्रूवाला यांनी मदतीचा हात दिला आहे. भारतीय तरूणांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे करिअर घडविण्यासाठी मदत करणे, हे या  उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असेल. भविष्यात डिजिटल क्षेत्रातील वाढत्या संधी आणि महत्त्व लक्षात घेता भारतीय तरूणांना त्यासाठी मदत तयार करण्यासाठीही या उपक्रमाची मदत होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुशल मनुष्यबळ असणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वत:च्या कौशल्यांचा विकास करण्याची आणि अधिक स्मार्ट होण्याची गरज आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आम्ही हा निधी उभारत असल्याचे रॉनी स्क्रूवाला यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या माध्यमातून २५ हजारांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांनी खचू नये. त्यांच्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध असेल. नोकरी लागल्यानंतर त्यांना हे कर्ज फेडता येईल, असे स्क्रूवाला यांनी सांगितले. याशिवाय, आर्थिक गरज असलेल्यांना या निधीतून मदत पुरवली जाईल. मात्र, ही शिष्यवृत्ती देताना गुणवत्ता हाच प्रमुख निकष असेल असेही स्क्रूवाला यांनी स्पष्ट केले.

आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतील, काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, अधिक स्मार्टपणे आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने काम करावे लागेल, हाच आमचा स्पष्ट संदेश आहे. त्यासाठी नोकरी करुनही शिक्षण घेता येईल, अशा आधुनिक शिक्षणपद्धतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या सगळ्यात ऑनलाइन शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय, जगात कुठेही पोहचू शकण्याची लवचिकता आणि व्यापकता हेदेखील ऑनलाइन शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे. ऑफलाइन शिक्षणात चुकीचे काही नाही. पण ही प्रक्रिया खर्चिक असते आणि यात प्रत्येक ठिकाणी शिक्षकांची कमतरता ही प्रमुख समस्या आहे. अशा स्थितीत ऑनलाइन शिक्षण महत्त्वाची भूमिका निभावू शकते, असे स्क्रूवाला म्हणाले.