पश्चिम बंगाल येथे फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात आरपीएफचा एक जवान मृत्युमुखी पडला, तर तीन जण जखमी झाले. माल्दा रेल्वेस्थानक परिसरात स्टॉल लावून धंदा करण्यास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून मज्जाव करण्यात येताच संतापलेल्या फेरीवाल्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयावर हल्ला चढवला. रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार अडवत स्टॉल लावून धंदा करणाऱ्या फेरीवाल्याला आरपीएफच्या जवानांनी मज्जाव केला असता फेरीवाल्याने विरोध दर्शविताच आरपीएफ जवानांकडून त्याला मारहाण करण्यात आल्याचे पोलिसाने सांगितले. पाठोपाठ फेरीवाल्यांचा एक मोठा जथ्था रेल्वेस्थानकानजीक असलेल्या आरपीएफच्या कार्यालयावर चाल करून आला. त्यांनी कार्यालयावर विटांचा मारा करण्यास सुरुवात केली. फेरीवाल्यांकडून अचानकपणे झालेल्या आक्रमणाने गोंधळून गेलेल्या आरपीएफ जवानाने स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचे समजते. त्यानंतर संतापलेल्या फेरीवाल्यांनी एस. सामंता नामक या जवानावर प्रचंड दगडफेक केली. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने रेल्वेस्थानक आणि परिसरात शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. आरएएफच्या जोडीला जीआरपीच्या तुकडीलादेखील तैनात करण्यात आले.