भारताने मंगळ मोहीमेसाठी जेवढा खर्च केला त्यापेक्षा जास्त खर्च भारतातील एका रेल्वे मार्गासाठी केला आहे. दिरंगाईच्या कारभारामुळे खर्चाचा आकडा अडीचशे कोटीवरुन थेट १,३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भारताच्या मंगळ मोहीमेवर ४५० कोटी रुपये खर्च झाले असताना रेल्वेमार्गासाठी तब्बल १३०० कोटी रुपये खर्च झाल्याने मंगळ मोहीमेपेक्षा आमचा रेल्वे मार्ग जास्त महाग असल्याची उपहासात्मक प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करत आहेत.

कर्नाटकमध्ये श्रवणबेलगोला मार्गे बंगळुरु – हसन हा रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम हाती घेणयात आले होते. १९९६ मध्ये या मार्गाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी होता. १९९६ मध्ये मांडलेल्या प्रस्तावानुसार या १६७ किमीच्या या प्रकल्पासाठी २९५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले होते. आता २१ वर्षानंतर हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला असून प्रत्यक्षात झालेला खर्च अंदाजित खर्चाच्या चार पट आहे. १६७ किलोमीटरच्या या मार्गासाठी तब्बल १,२८९ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे वृत्त अहमदाबाद मिरर या वृत्तपत्राने दिले आहे.

हसन – बंगळुरु मार्गावर झालेला खर्च हा मंगळ मोहीमेवर झालेल्या खर्चापेक्षा जास्त असल्याचे स्थानिक सांगतात. जेवढ्या पैशात मंगळावर पोहोचता येते, त्यापेक्षा जास्त पैशांमध्ये आम्ही हसनवरुन बंगळुरुला पोहोचलो असे स्थानिक सांगतात. १६७ किमीच्या या मार्गातील हसन ते श्रवणबेलगोला हा ४४ किमीचा मार्ग २००६ मध्ये पूर्ण झाला होता. तर नीललमंगाला ते चिक्काबांवरा हा १३ किमीचा मार्ग २०१३ मध्ये पूर्ण झाला. म्हणजे रेल्वेला ५८ किमीचा हा  मार्ग बांधण्यासाठी तब्बल १७ वर्ष लागल्याचे स्पष्ट होते. कर्नाटक सरकारने जागा उपलब्ध करुन देण्यास विलंब केल्याने प्रकल्पाची किंमत वाढली असा दावा रेल्वेचे अधिकारी करतात. भूसंपादनादरम्यान स्थानिकांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्याने आम्हाला मार्गात बदल करावा लागला याकडेही अधिका-यांनी लक्ष वेधले. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी सरसरी ८ किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात आला.

हसन – बंगळुरु मार्ग पूर्ण झाला असून नुकतीच सुरक्षेची चाचणीही पार पडली आहे. आता लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असे अधिका-यांनी म्हटले आहे. आता या मार्गावरुन १२० किमी या वेगाने रेल्वे धावू शकेल असे अधिका-यांनी आवर्जून सांगितले.