लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर, दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोठ्या थाटात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मोदींच्या या शपथविधी सोहळ्यावर तब्बल १७.६० लाख रूपयांचा खर्च झाल्याची माहिती अधिकारांतर्गत  स्पष्ट झाले आहे. या सोहळ्याला अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी मिळून ४०१७ पाहुणे उपस्थित होते. या पाहुण्यांच्या सरबराईसाठीच्या सुविधा, शपथ घेण्यासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ, फर्निचर अशा सर्व गोष्टींवर मिळून १७.६० लाख रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती सचिवालयातर्फे देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वर्मा यांनी माहिती अधिकारातंर्गत शपथविधी सोहळ्यातील प्रत्येक खर्चाचे तपशीलवार विवरण मिळविण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रपती सचिवालयातर्फे याबद्दलची तपशीलवार माहिती दिली नसली तरी, संबंधित खर्चासाठी वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.