कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले धरण उद्घाटनाच्या एक दिवस आधीच फुटल्याची घटना बिहारच्या भागलपूरमध्ये घडली. यामुळे आसपासच्या भागात पाणी शिरले. धरणाची भिंत कोसळल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला. बिहार आणि झारखंडमधील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा पुरवण्यासाठी भागलपूरच्या बटेश्वरस्थानमध्ये धरण उभारण्यात आले. गंगा नदीवरील या धरणाच्या उभारणीसाठी ३८९.३१ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

भागलपूरमध्ये बांधण्यात आलेले धरण मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. नितीश कुमार आज या धरणाचे उद्घाटन करणार होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ट्रायल रनसाठी धरणाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी पाण्याचा दबाव वाढल्याने धरणाची एक भिंत कोसळली. त्यामुळे परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले. याचा फटका कहलगाव, एनटीपीसी टाऊनशीप भागात राहणाऱ्या लोकांना बसला. कहलगावमधील न्यायाधीशांच्या निवासस्थानांमध्येही पाणी शिरले आहे.

नव्या धरणाची भिंत कोसळल्याने राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. धरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी भागलपूरमध्ये मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले. कोट्यवधींच्या सृजन घोटाळ्यानंतर आता भागलपूरमध्ये नवा घोटाळा समोर आला आहे, अशी टीका राजदचे आमदार रामविलास पासवान यांनी केली.

भागलपूरमध्ये बांधण्यात आलेल्या धरणाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री नितीश कुमार, जलसंपदा मंत्री राजीव रंजन आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सदानंद सिंह उपस्थित राहणार होते. सध्या प्रशासनाकडून रहिवासी भागात शिरलेले पाणी काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी वाळूच्या गोणी वापरल्या जात आहेत. या प्रकल्पामुळे भागलपूरमधील १८ हजार ६२० हेक्टर, तर झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील ४०३८ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे.