पाचजणांच्या कुटुंबाला दरमहा सहाशे रुपये पुरायला काय हरकत आहे, असा सवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी शनिवारी केला आणि रविवारी विरोधकांनी त्यांनी तोडलेल्या ताऱ्यांची सव्याज परतफेड केली.
सरकारच्या नव्या योजनेनुसार दारिद्रय़ रेषेखालील आधार कार्डधारक ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यात दरमहा थेट ६०० रुपये जमा होणार आहेत. देशातील दोन लाख गरीब कुटुंबांना त्याचा लाभ होणार असून त्याची अंमलबजावणी दिल्लीत प्रथम होत आहे. मात्र या तुटपुंज्या तरतुदीवर सर्व थरांतून टीका होऊ लागताच सहाशे रुपयात महिनाभराची डाळ, तांदूळ आणि गहू त्या कुटुंबाला घेता येतेच की, असे दीक्षित म्हणाल्या होत्या. भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, शेकडो वर्षांपूर्वी लोकांना ६०० रुपयांत महिन्याचे घर चालवता येत होते. पण आता सहाशे रुपयांत एकवेळचे जेवणही महिनाभर घेता येणार नाही. काँग्रेस गरीबांची थट्टा उडवत आहे.