कोझिकोडे येथील भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत जाहीर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांकांबद्दल ‘परिष्कृत’ या शब्दाचा वापर केला होता. परंतु पंतप्रधानांच्या परिष्कृत या शब्दावरून मात्र ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आमनेसामने आले आहेत. मोदी यांनी परिष्कृत हा शब्द सशक्तीकरणासाठी वापरला असेल तर तो त्यांचे सरकार हे असे करताना दिसत नाही. हिंदीमध्ये परिष्कृत शब्दाचा अर्थ शुद्धता असा आहे. परंतु मुसलमानांना भाजपकडून शुद्धता नकोय. जर त्यांना सशक्तीकरण हा अर्थ अभिप्रेत होता तर त्यांनी कुंडू कमिटीच्या शिफारशी का लागू केल्या नाहीत. जाट आणि पटेल समाजाला ताकद पुरवली जात आहे. पण महाराष्ट्रात आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुसलमानांना अशी साथ मिळताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.
आरएसएसचे ज्येष्ठ प्रचारक राकेश सिन्हा यांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, मुसलमानांना आपल्या जुन्या मानसिकतेतून बाहेर यावे लागेल आणि स्वत:ला भारतीय संस्कृतीत ‘अन्य’ समजणे बंद केले पाहिजे. इस्लामला भारतीय परंपरा आणि संस्कृती स्वीकारावी लागेल.
राकेश सिन्हा म्हणाले, जे लोक सध्या मोदींच्या भाषणावर टीका करत आहेत. त्यांनी जानेवारी १९४८ मध्ये नेहरू यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठात केलेले भाषण वाचावे. त्यावेळी त्यांनी मुस्लिमांना ते भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेवर विश्वास ठेवतात का असा सवाल करत संस्कृतीप्रमाणेच मुसलमानांनी भारताच्या अखंड आणि बौद्धिक परंपरेला आपलेसे केले आहे.
मुसलमानांना पुरस्कृत करा, तिरस्कृत नको. त्यांना सशक्त बनवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोझिकोडे येथील आपल्या भाषणात केले होते.