राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना कोणत्या विधानावर ठाम आहात, असा प्रश्न विचारत पेचात टाकण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील वक्तव्यावर की भिवंडीतील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावर ठाम आहात, असा प्रश्न संघाने उपस्थित केला. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
महात्मा गांधी हत्येप्रकरणी संघाला बदनाम केलेले नाही, राहुल गांधींचा युक्तिवाद
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील प्रचारसभेवेळी राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी गांधींची हत्या केली, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे संघाने त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयीन सुनावणीवेळी राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे म्हणत आधीच्या वक्तव्यावरून घुमजाव केले होते. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम केलेले नसून, त्याच्याशी संबंधित एका व्यक्तीवर आरोप केले आहेत, असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्राच्या रुपाने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. समाजात द्वेष पसरवून दरी निर्माण करणाऱ्या संघाविरोधात लढणे मी कधीही थांबवणार नाही. त्यांच्याविरोधात बोललेल्या प्रत्येक वक्तव्यावर मी ठाम आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. त्यांच्या या ट्विटनंतरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तुम्ही कोणत्या विधानावर ठाम आहात, असा थेट प्रश्न राहुल गांधी यांना विचारला. प्रतिज्ञापत्र आणि प्रचारसभा तसेच ट्विटमधील वक्तव्यांमध्ये अंतर असल्यामुळे संघाने हा प्रश्न विचारून राहुल गांधी यांना पेचात टाकण्याचा प्रयत्न केला.
राहुल यांचे घुमजाव, संघाबाबतच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे ट्विट